कल्याण – कल्याण पूर्वेतील एका अल्पवयीन बालिकेच्या हत्या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या मयत विशाल गवळीची पत्नी साक्षी गवळी हिला गुरूवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही. ए. पत्रावाले यांनी जामीन मंजूर केला. गुन्हा घडल्यानंतर मागील सात महिन्यांपासून ती तुरूंगात होती.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कल्याण पूर्वेत चक्कीनाका भागात विशाल गवळी याने एका अल्पवयीन बालिकेला आपल्या घरात नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली होती. या कालावधीत विशालची पत्नी कामावर गेली होती. ती बँकेत नोकरीला होती. बालिकेची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी विशाल प्रयत्न करत होता. संध्याकाळी पत्नी साक्षी घरी आल्यावर तिला आपल्या पतीने घरात बालिकेची हत्या केल्याचे निदर्शनास आले.

विशाल आणि पत्नी साक्षीने एका रिक्षा चालकाच्या सहकार्याने मध्यरात्रीच्या सुमारास बालिकेचा मृतदेह कल्याण भिवंडी रस्त्यावर एका गाव हद्दीत फेकून दिला होता. या घटनेनंतर विशाल फरार झाला होता. पोलिसांनी त्याला अटक केली होती. या अटकेनंतर पोलिसांनी त्याची पत्नी साक्षीला अटक केली होती. या हत्या प्रकरणात, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात साक्षीचाही सहभाग असल्याचा आरोप बालिकेच्या कुटुंबीयांनी केला होता. बालिकेच्या हत्याप्रकरणाने महाराष्ट्र हादरला होता.

हे प्रकरण विशेष जलदगती न्यायालयासमोर चालवून आरोपींना फाशीची शिक्षा होईल अशी जोरदार मागणी नागरिक, पीडित बालिकेच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत होती. या प्रकरणात सरकारने सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्जवल निकम यांची नियुक्ती केली होती.

हा खटला कल्याण जिल्हा न्यायालयातील विशेष बाल लैंगिक अत्याचार न्यायालयात चालविला जात होता. या खटल्याच्या सुनावण्या सुरू होत्या. विशाल गवळीने दोन महिन्यापूर्वी तळोजा तुरूंगात गळफास घेऊन आत्महत्या केली. साक्षीच्यावतीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या गुन्ह्यात बालिकेचे अपहरण, तिचा खून साक्षीचा पती विशालने केला होता, असे न्यायालयाला साक्षीच्या वकिलांकडून सांगण्यास आले. साक्षीने पतीला मृतदेह लपविण्यासाठी आणि विल्हेवाट लावण्यासाठी साहाय्य केले, असा तिच्यावर आरोप आहे. गु्न्हा घडला त्यावेळी आपण बँकेत कामावर होते. घरी येण्यापूर्वीच गुन्हा घडून गेला होता. या प्रकरणात विशालने आपणास धमकावून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आपणास साहाय्य करण्यास सांगितले, असे साक्षीच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल आहे. साक्षी तपास काम आणि खटल्याच्या कामात सहकार्य करत आहे. त्यामुळे सरकारी वकील आणि तपास यंत्रणांनी तिच्या जामिनाला हरकत नसल्याचे न्यायालयाला सांगितले. साक्षी गवळी हिची भूमिका पुरावे लपविण्यापुरती होती, असे मत न्यायालयाने नोंदविले. भारतीय न्याय संहितेच्या कलम २३८(अ) अंतर्गत हा गुन्हा जामीनपात्र असल्याने न्यायालयाने तिला दहा हजार रूपयांच्या वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर केला.