कल्याण – एका १५ वर्षाच्या अल्पवयीन तरूणीचे २२ वर्षाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधातून तरूणी गर्भवती राहीली. तिने मुलीला जन्म दिला. मात्र जन्मलेल्या मुलीला कल्याणच्या बारावे गावातील कचऱ्याच्या कुंडी जवळ फेकून देण्यात आले. नवजात मुलीला बेवारस स्थितीत फेकणाऱ्या आरोपीला शोधून काढण्यात खडकपाडा पोलिसांना यश आले आहे. रोहीत प्रदीप पांडे (२२) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव इसमाचे आहे कल्याण न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
रविवारी १७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडे असलेल्या बारावे गावातील शिवमंदिराजवळच्या कचरा कुंडी जवळ बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. पादतीचाऱ्यांनी जवळ जाऊन पाहिले तर नवजात बालक रडत होते. कचरा टाकण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेऊन या संदर्भात खडकपाडा पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी तातडीने त्याठिकाणी जाऊन बाळाला ताब्यात घेतले.
नवजात बालक स्त्रीलिंगी होते. एक दिवसापूर्वी जन्मलेल्या या बालकाला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रूग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२), (एम), ९३, ३ (५) सह बाल न्याय (लहान मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा २०१५ चे कलम ७५ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४, ८, १२ अन्वये गुन्हा नोंदवून बाळाला बेवारस स्थितीत कचऱ्याच्या कुंडीत फेकून देणाऱ्या तिच्या पालकांना शोधून काढण्यासाठी पोलिसांनी तपास चक्रांना वेग दिला.
बाळाचे पालकत्व लपविण्याच्या उद्देशातून हा प्रकार घडल्याने वरीष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक मारूती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय गायकवाड, सपोनि सतीश पाटील, पोलिस उपनिरीक्षक भूषण देवरे आणि त्यांच्या पथकाने त्या दिशेने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तरूणीला शोधून काढले. या तरूणीने बाळ आपलेच असल्याची कबूली दिली. त्यानंतर पोलिसांनी रोहित पांडे याला अटक केली. रोहितचे अल्पवयीन तरूणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यातून या तरूणीने मुलीला जन्म दिला. पालकत्व लपविण्यासाठी नवजात एक दिवसाच्या मुलीला कचऱ्यात फेकून दिले.
संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याने रोहितच्या विरोधात पोक्सा कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे. नवजात बाळाच्या अल्पवयीन आईला पोलिसांनी ठाण्याच्या सिव्हील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. प्रसूतीनंतर रक्तस्त्राव होऊ लागल्याने तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. सद्या तिची प्रकृती स्थिर आहे. संबंधित आरोपी व अल्पवयीन तरूणाची डीएनए टेस्ट करणार येणार आहे. आरोपी तरूणाच्या माता-पित्यसाह तरूणीच्या आजीविरोधातही कारवाई केली जाणार आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक मारूती आंधळे आणि त्यांचे सहकारी या प्रकरणाचा चौकस तपास करत आहेत.