कल्याण – विकास हवा असेल तर कल्याण डोंबिवली पालिकेवर यावेळी भाजपचाच महापौर बसला पाहिजे आणि त्या दृष्टीने भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कल्याण परिसर भाजपमय करण्याच्या आणि कामाला लागण्याच्या सूचना तीन महिन्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेचे कल्याणमधील जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी ‘आगामी निवडणुकीत याल तर तुमच्यासह या, अन्यथा, तुम्हाला आडवे केल्या शिवाय राहणार नाही,’ असा इशारा भाजपला कल्याण मधील एका छोटेखानी कार्यक्रमात दिल्याने महायुतीत कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

कल्याण, डोंबिवलीत वरून दिसते तसे भाजप आणि शिंदे शिवसेनेत सख्यचे वातावरण नाही. पतंगीच्या काटाकाटीप्रमाणे भाजप आणि शिंदे शिवसेनेत पडद्यामागून एकमेकांचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या बाजुने ओढण्याचे प्रकार सुरू आहेत. कोणत्याही परिस्थितीत कल्याण डोंबिवली पालिकेवर भाजपचा महापौर बसेल आणि पालिका निवडणुकीत भाजपचे संख्या बळ वाढेल या दृष्टीने शिंदे शिवसेना आणि भाजपने आपली राजकीय ताकद पणाला लावून पालिका निवडणुकीपूर्वी आपल्या विजयाचा पाया भक्कम करण्याची जोरदार सुप्त तयारी सुरू केली आहे.

अशा परिस्थितीत कल्याणमधील एका छोटेखानी कार्यक्रमात शिंदे शिवसेनेचे कल्याणमधील जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी, कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी युती होईल, न होईल हा नंतरचा भाग झाला. पण येणार असाल तर तुमच्यासह या, अन्यथा तुम्हाला आडवे केल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा भाजपला दिल्याने महायुतीसह भाजप गोटात अस्वस्थता पसरली आहे.

वादग्रस्त विधाने करण्यात, राजकीय अस्वस्थतेचे वातावरण निर्माण करण्यात जिल्हाप्रमुख मोरे हे पटाईत आहेत. यापूर्वी त्यांना व्यासपीठावर बसण्याचा मान मिळाला नव्हता म्हणून त्यांनी मानाच्या पदाचा राजीनामा देऊन सवता सुभा स्थापन करण्याची तयारी केली होती. त्यामुळे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांच्या विधानाची भाजप, शिंदे शिवसेनेकडून किती दखल घेतली जाते. त्यांना समज दिली जाते की बळ दिले जाते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आमच्या शिवाय विजयी होऊ शकतो, असे कोणाला वाटत असेल तर त्यांनी खुलेपणाने पालिका निवडणुका लढवून दाखवाव्यात. आम्ही ते आव्हान स्वीकारण्यास तयार आहोत, असे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपला उद्देशून आव्हान दिले. शिंदे शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाप्रमाणे महायुतीचे काम करण्याचे आदेश झाले तर एकत्रितपणे महायुतीचे उमेदवार पालिका निवडणुकीत आम्ही एकत्रित प्रयत्न करू. पण, युती होईल तेव्हा होईल. तो नंतरचा भाग झाला. प्रत्येक प्रभागातून शिंदे शिवसेनेचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल, यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने आपली ताकद पणाला लावयाची आहे. आणि पालिकेवर शिंदे शिवसेनेचा भगवा फडकावयाचा आहे, असे आवाहन जिल्हाप्रमुख मोरे यांनी शिवसैनिकांना केले आहे.