कल्याण: कल्याण पश्चिमेत रामबाग भागात तीन जणांनी एका नागरिकाला अडवून त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. ते पैसे न दिल्याने तीन जणांनी नागरिकाला लाथाबुक्क्यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. त्याचबरोबर नागरिकाच्या डोक्यात विटा मारून त्यांना गंभीर जखमी केले आहे. शनिवारी रात्री हा प्रकार घडला आहे.

या मारहाण प्रकरणातील एक सराईत गुन्हेगार असल्याचे आणि त्याच्यावर यापूर्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.याप्रकरणी जोशीबाग भागात राहणारे महेंद्र निचित यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तेजस निखारंगे, अभिनंदन खरात आणि मोहन नडार यांच्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. अभिनंदन थोरात याच्या विरुध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात यापूर्वीच पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाने गु्न्हा दाखल केला आहे.

तक्रारदार महेंद्र निचित यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपण शनिवारी रात्री सव्वा नऊ वाजता जोशीबाग भागातील ॲड. विशाल भोईर यांच्या कार्यालयासमोरून सार्वजनिक रस्त्यावरून पायी चाललो होतो. आपणास अभिनंदन, तेजस आणि मोहन यांनी अडविले. आपणाकडे ते दारू पिण्यासाठी पैशाची मागणी करू लागले.

आपणाकडे पैसे नाहीत. असे बोलून तक्रारदार महेंद्र निचित पुढे जाऊ लागताच, तिघांनी मिळून महेंद्र यांना अडविले. त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.मोहन नडार, अभिनंदन खरात यांनी बाजुला पडलेल्या विटा उचलून त्या विटांचा मारा महेंद्र निचित यांच्या डोक्यात करून त्यांना गंभीर जखमी केले. अचानक घडलेल्या या प्रकाराने तक्रारदार हादरले. त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाणे गाठले. तेथे तिन्ही मारेकऱ्यांविरुध्द तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुकलाला चौधरी याप्रकरणाचा तपास करत आहेत.