कल्याण : मागील पंधरा दिवसांंपासून ठाणे जिल्ह्यातील कल्याण, शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यातील तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. या रखरखीत उन्हाचे सर्वाधिक चटके शेतात काम करणारे शेतकरी, इमारत आणि इतर बांधकामांंवर काम करणाऱ्या मजुरांना सर्वाधिक बसत आहेत. शहापूर तालुक्यात दररोज उष्माघाताचा त्रास होणारे सात ते आठ रूग्ण शहापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत.

मुरबाड, भिवंडी तालुक्यात हे प्रमाण कमी आहे. शहापूर तालुक्यात गेल्या आठवड्यापासून तापमानाचा आकडा ४३ अंशापर्यंत पोहचला आहे. तापमान वाढत असले तरी पावसाळाही तोंडावर ठेपला आहे. पावसाळ्यापूर्वीची शेताच्या बांधबंदिस्ती, ट्रॅक्टरने उखळून ठेवलेल्या जमिनीतील मातीच्या ढेपी फोडण्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करायचे आहे. काही शेतकऱ्यांना राब करण्यासाठी जमीन भाजणीची (रोमटे) कामे करायची आहेत. ही कामे एप्रिल ते मे या कालावधीत केली जातात.

हेही वाचा : ठाण्याची जागा शिवसेनेकडे, मिरा भाईंदर भाजपात नाराजी

या कामांसाठी शेतकरी आता अधिक संख्येने शेतावर जात आहे. भर उन्हात काम करत असल्याने अगोदर पाणी पिऊन हैराण झालेला शेतकरी, मजूर उन्हाचा चटका वाढू लागतो तसे त्याच्या शरीरात पाणी राहत नाही. काही शेतकरी, मजुरांना शेतातच काम करत असताना चक्कर येते. काही शुध्द हरपून पडतात. अशा रुग्णांंना त्यांचे नातेवाईक तातडीने स्थानिक सरकारी रुग्णालयात नेतात. तेथे प्राथमिक उपचार करून शहापूर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात आणतात. अशा रुग्णांंची तपासणी करून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले जातात, असे शहापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याने सांंगितले.

तापमान वाढल्यापासून उष्माघाताचे रुग्ण वाढण्याची शक्यता विचारात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात तशा वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शहापूर ग्रामीण भागातून दररोज उष्माघाताचा त्रास झालेले सात ते आठ शेतकरी, मजूर कष्टकरी दाखल होतात, असेही हा अधिकारी म्हणाला. मुरबाड ग्रामीण भागात नदी, ओहोळ, लहान पाणवठे, लहान धरणे आहेत. बारवी धरणाचा आणि त्या लगत माळशेज घाटाचा जंंगल पट्टा आहे. त्यामुळे या भागात तापमान अधिक असले तरी हवेत दमटपणा आहे. त्यामुळे या भागात उष्माघाताचे प्रमाण कमी आहे, असे एका जाणकाराने सांगितले. भिवंडी भागात बहुतांशी शेतकऱ्यांंच्या जमिनीत गोदामे उभी राहिली आहेत. या भागात शेतीचे सर्वाधिक व्यापारीकरण होत आहे. त्यामुळे या भागातही शेतकरी, मजूर यांंच्या उष्माघाताचे प्रमाण नगण्य असल्याचे जाणकाराने सांगितले.

हेही वाचा : डोंबिवलीतील ठाकुर्ली उड्डाण पूल कोंडीच्या विळख्यात, दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत पुलावर वाहनांचा रांगा

वाढत्या तापमानामुळे शहापूर ग्रामीण भागातून उष्माघाताचा त्रास झालेले काही रुग्ण दररोज प्राथमिक उपचार घेऊन शहापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतात. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करून ते सुस्थितीत होतील याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
डाॅ. गजेंद्र पवार (वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, शहापूर)

वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा त्रास झाला तर घ्यावयाची काळजी याविषयी गावोगावी जनजागृती मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून राबविली जात आहे. शेतकरी, मजूर यांना प्राधान्याने ही माहिती दिली जात आहे.

डाॅ. संग्राम डांगे (वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, मुरबाड)