कल्याण : अंबरनाथ येथील रहिवासी असलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे येथील शहाड जकात नाका जवळील पेट्रोल पंप भागात तीन जणांनी अपहरण केले. म्हारळ गाव भागातील टेकडीवर नेऊन चाकुचा धाक दाखवून त्याच्या जवळील १६ हजार रूपये लुटले. नीरज भोलानाथ यादव (२०) असे अपहरण करून मारहाण झालेल्या मुलाचे नाव आहे. तो अंबरनाथ भागात राहतो. विनायक मदने, विजय, आर्यन अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले, मंगळवारी रात्री तीनच्या सुमारास तक्रारदार नीरज शहाड जकात नाका येथे घरी जाण्यासाठी उभा होता. तो वाहनाची वाट पाहत होता. तेवढ्यात तेथे आरोपी आले. त्यांनी नीरजला जबरदस्तीने त्यांच्या दुचाकीवर बसविले. नीरज एकटाच असल्याने तो प्रतिकार करू शकला नाही.

हेही वाचा : कल्याण मधील रोझाली सोसायटीत पदाधिकाऱ्यांकडून साडे चार लाखांचा अपहार, प्रशासकाकडून गुन्हे दाखल

म्हाऱळ गावजवळील टेकडीवर नीरजला रात्री नेऊन तेथे त्याला बेदम मारहाण केली. त्याला चाकुचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. नीरज जवळील डेबिट, क्रेडिट कार्ड, त्याच्या जवळील रोख रक्कम आरोपींनी काढून घेतली. जवळील एटीएम मधून नीरज समोरच त्याच्या बँक खात्यामधील रक्कम काढली. एकूण १६ हजारांचा ऐवज लुटून झाल्यानंतर आरोपींनी नीरजला तेथेच सोडून पळ काढला. नीरजने महात्मा फुले पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.