कल्याण – टिटवाळा येथील श्री महागणपती मंदिराजवळील वाहनतळावर गाळ, चिखल साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशावरून अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी पालिका सफाई कामगार, अग्निशमन विभागाच्या जवानांच्या साहाय्याने वाहनतळावर पावसामुळे साचलेला गाळ आणि वाहनांच्या वर्दळीमुळे तयार झालेला चिखल साफ करून वाहनतळ स्वच्छ केला. याठिकाणी जंतूनाशकाची नियमित फवारणी करण्याची व्यवस्था केली.

टिटवाळ्यातील महागणपती मंदिर येथे शेकडो भाविक दररोज रेल्वे, वाहनाने येतात. मंदिर परिसरात भाविकांची वाहने उभी करण्यासाठी भव्य वाहनतळ आहे. या वाहनतळावर भाविकांच्या वाहनांची सतत वर्दळ असते. गेल्या काही दिवसांपासून वाहतळावरील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नव्हता. या साचलेल्या पाण्याच्या माध्यमातून वाहनतळावर गाळ तयार झाला होता. कधी पाऊस तर कधी उन, असे चित्र असल्याने, उन पडले की वाहनतळावरील गाळ सुकून त्याचे लगदे तयार होत होते. पाऊस सुरू झाला की हे लगदे पावसाच्या पाण्यात विरघळून त्याचा चिखल तयार होता होता.

वाहनतळाजवळील गटारांची पाणी वाहून नेणारी तोंडे चिखल, गाळाने बंद झाली होती. मुसळधार पाऊस पडला की वाहनतळावर पाणी तुंबून राहत होते. वाहनतळावर गणेश मंदिरात जाणाऱ्या भाविकांची वर्दळ होती. वाहनतळाच्या बाजूला रिक्षा वाहनतळ आहे. व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. त्यांचीही या भागात वर्दळ होती. वाहनतळावर पाणी तुंबण्याच्या प्रकारामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. परिसरातील रहिवासी, व्यापारी, रिक्षा चालक त्रस्त होते. सामाजिक कार्यकर्ते विजयभाऊ देशेकर यांनी प्रशासनाकडे याबाबत तक्रारी केल्या. या वाहनतळांवरील चिखल, गाळ आणि डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाविषयी तक्रारी वाढू लागल्याने आयुक्त अभिनव गोयल यांनी अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांना महागणपती मंदिराजवळील वाहनतळावरील तुंबलेले पाणी, गाळ, चिखलाची समस्या तातडीने सोडविण्याचे आदेश दिले.

साहाय्यक आयुक्त पाटील यांनी पालिका अग्निशमन दल, सफाई कामगारांची पथके घेऊन महागणपती मंदिराजवळील वाहनतळ गाठले. पहिले अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन बंबातील पाणी उच्च दाबाने वाहनतळावरील गाळावर फवारून गाळाचे पाणी केले. वाहनतळा लगतची गटाराची गाळाने बंद असलेली पाणी वाहू भोके उघडण्यात आली. त्यामधून वाहनतळावरील पाणी गटारात ढकलण्यात आले. वाहनतळाची अग्निशमन जवानांनी उच्च दाब पाण्याने सफाई केल्याने वाहनतळ गाळ, चिखलमुक्त झाला. त्यानंतर सफाई कामगारांनी वाहनतळ परिसरातील झाडे, झुडपे, दुकानांच्या कोपेर यांच्यामध्ये जंतूनाशक फवारणी करून परिसर डासमुक्त केला. आयुक्त गोयल, साहाय्यक आयुक्त पाटील यांनी तक्रारींची तातडीने दखल घेऊन वाहनतळ स्वच्छ केल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टिटवाळा महागणपती मंदिराजवळील वाहनतळावरील गाळ काढून टाकण्यात आला आहे. या वाहनतळावर मुसळधार पाऊस पडला तरी पाणी तुंबणार नाही, गाळ साचणार नाही अशी व्यवस्था केली आहे. गणपती मंदिरात नियमित भाविक येतात. या भागात साथ आजार पसरू नये म्हणून नियमित जंतूनाशक फवारणी केली जाणार आहे. – प्रमोद पाटील (साहाय्यक आयुक्त, अ प्रभाग.)