कल्याण : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील २७ पैकी १९ कर्मचारी मराठा, खुल्या प्रवर्गातील समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी महसूल विभागाने वेगवेगळ्या भागात नियुक्त केले आहेत. हे काम अत्यावश्यक सेवेतील असल्याने आपले मूळ काम सोडून उपप्रादेशिक कार्यालयातील कर्मचारी गेल्या आठवड्यापासून महसूल विभागाने दिलेल्या कामासाठी कर्तव्यावर जात असल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाचा कल्याण मधील कारभार ठप्प पडला आहे.

कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यक्षेत्र कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड आहे. या भागातून वाहन चालक, मालक आपल्या वाहनाचे नुतनीकरण, परवाना, नोंदणी पुस्तिका घेण्यासाठी, शिकाऊ वाहन प्रशिक्षणासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दररोज फेऱ्या मारत आहेत. परंतु, कामे करण्यासाठी मंचका समोर कर्मचारी दिसत नसल्याने नागरिकांना कार्यालयातून माघारी परतावे लागत आहे. सात ते आठ कर्मचारी विविध खिडक्यांवर काम करताना दिसत आहेत. त्यांच्या समोर विविध प्रकारची कामे घेऊन वाहन चालक, रिक्षा चालकांची गर्दी असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : शासन सेवेतील साहाय्यक आयुक्तांची तडकाफडकी उचलबांगडी, बेकायदा बांधकामे रोखण्यात अपयशी

अनेक खिडक्यांवर लिपीक, अधीक्षक पदावर मोटार वाहन निरीक्षक काम करताना दिसत आहेत. खिडकीवर गर्दी नको म्हणून वाहन मालक, चालकांना कार्यालयात कर्मचारी संख्या कमी असल्याने ऑनलाईन माध्यमातून कामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांकडून वाहन मालकांना केल्या जात आहेत. कर्मचाऱ्यां अभावी आरटीओ कार्यालयात विविध प्रकारच्या कामांच्या नस्तींचे ढीग साचले आहेत. शहापूर, मुरबाड भागातून आलेल्या नागरिकांना आरटीओ कार्यालयात काम होत नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागते. आरटीओ कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय नको म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी स्वता विविध विभागात फिरून आहे त्या परिस्थितीत नागरिकांची कामे करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना करत आहेत. सर्वेक्षणासाठी गेलेला आरटीओतील कर्मचारी सर्वेक्षण करताना नागरिक सहकार्य करत नसल्याने त्रस्त आहे.

हेही वाचा : ठाण्यात शुद्ध पाण्याच्या गुणवत्तेत घसरण पाणी गुणवत्ता प्रमाणात दोन टक्क्यांनी घट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सर्वेक्षण कामासाठी आरटीओतील बहुतांशी कर्मचारी नियुक्त केला आहे. त्यामुळे कार्यालयात कर्मचाऱ्यांची उणीव आहे. उपलब्ध अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने नागरिकांची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.” – विनोद साळवी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण.