शहापूर : लेखापरीक्षक कंपनीच्या माध्यमातून केलेल्या तपासणीत बारदानाचा तब्बल २५ लाखांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी आदिवासी विकास महामंडळातील प्रतवारीकार दीपक गरुड यांच्यावर शहापुर तालुक्यातील किन्हवली व शहापुर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणात गरुड यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा : ठाणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यातील कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण, एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या पशुसंवर्धन विभागाकडून नष्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या आदेशानुसार जव्हार येथील प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील यांनी याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सन २०१९ – २० आणि २०२० – २१ मध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या भातासोबत बारदानही घेण्यात आले होते. शासनाकडून शेतकऱ्यांना बारदान परत देण्यासाठी दोन लाख ५१ हजार ७६३ बारदानाचे नग २०२३ -२४ मध्ये प्राप्त झाले होते. तालुक्यातील खर्डी आणि किन्हवली केंद्रांतर्गत असणाऱ्या भातसानगर, बाभळे आणि सावरोली येथील गोदामात बारदान ठेवण्यात आले होते. या बारदानाची देखभाल करणे आणि शेतकऱ्यांना वाटप करण्याची जबाबदारी प्रतवारीकार दीपक गरुड यांच्यावर होती. मात्र बारदानाची परस्पर विक्री झाल्याचा तक्रारी प्राप्त झाल्याने व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी मे. के.पी. एन. या लेखापरीक्षक कंपनीला तपासणी करण्यासाठी नेमले होते. लेखापरीक्षक पथकाने गोदामांची केलेल्या तपासणीत सुमारे २५ लाखाचे ४५ हजार बारदानाचे नग कमी आढळून आले असून सुमारे ३२ हजार नग खराब झाल्याचे आढळून आले. लेखापरीक्षक पथकाला प्रतवारीकार दीपक गरुड यांनी दप्तर उपलब्ध करून दिले नसून उपलब्ध असलेले दप्तर अद्ययावत नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. आदिवासी विकास महामंडळात बोगस भात खरेदी नंतर आता बारदानातही अपहार झाल्याचे उघडकीस आल्याने आदिवासी विकास महामंडळ चर्चेत आले आहे.दरम्यान, संबंधित माहिती पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांनी दिली असून याबाबत तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.