डोंबिवली – कल्याण शिळफाटा रस्त्यावरील काटई निळजे रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलाच्या दोन्ही बाजुच्या पोहच रस्त्यांसाठी भूसंपादन झाले नसल्याने पुलाच्या दोन्ही बाजुच्या अरूंद बॉटलनेक रस्त्यावर सकाळ, संध्याकाळ कोंडी होत आहे. सहा पदरी मार्गिकेतून सुसाट आलेली वाहने पुलाच्या दोन्ही बाजुला उतरताना बॉटलनेक मार्गिंकामुळे कोंडीत अडकत आहेत.
भिवंडी बाह्यवळण रस्ता ते शिळफाटा दत्तमंदिर चौक (कल्याण फाटा) २१ किलोमीटर लांबीचा रस्ता रुंदीकरण करून एमएसआरडीसीने सहा पदरी केला आहे. सीमेंट काँक्रीटच्या या रस्त्यांवरून वाहने सुसाट धावत आहेत. काटई ते निळजे, देसाई, खिडकाळी गाव हद्दीत शिळफाटा रस्त्यालगत असलेल्या शेतकऱ्यांना रस्त्याचा मोबदला देण्यात आला नाही. त्यामुळे शेतकरी शिळफाटा रस्ता रूंदीकरणासाठी जमिनी देत नाहीत. पहिले बाधितांना मंजूर झालेली ३०७ कोटीची भरपाई द्या, मगच रुंदीकरणासाठी जमिनी देऊ, अशी आक्रमक भूमिका बाधित शेतकऱ्यांनी घेतली आहे.
नव्याने खुला करण्यात आलेल्या काटई निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजुला काटई, निळजे गावांची हद्द आहे. या भागातील बाधित शेतकऱ्यांनी अद्याप शिळफाटा रस्ता रूंदीकरणासाठी जमीन दिली नाही. त्यामुळे काटई निळजे पूल रूंद झाला असला तरी पुलाच्या कल्याण दिशेने आणि शिळफाटा, पलावा चौक दिशेने वाहने उतरताना अरूंद रस्ता असल्याने सहा पदरी मार्गिकेतून आलेली वाहने या चार पदरी अरूंद मार्गिकेत अडकून पडत आहेत, असे प्रवाशांनी सांगितले.
दोन वर्षापूर्वी शासनाने शिळफाटा बाधित शेतकऱ्यांचा मोबदला मंजूर केला आहे. त्याचे वाटप केले जात नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी जोपर्यंत मोबदला देत नाहीत तोपर्यंत एक इंच जमीन रस्ता रुंदीकरणासाठी देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. काटई निळजे पूल सुरू झाल्याने पलावा चौकातील कोंडी काही प्रमाणात कमी झाली आहे, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
काटई गाव हद्दीत मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर असलेली वाहतूक पोलीस चौकी आणि त्याच्या बाजुची बाजार समितीची शुल्क वसुली टपरी या भागातून हटविण्यात यावी. या दोन्ही टपऱ्या वाहतुकीला आता अडथळा येत आहेत. वाहतूक पोलीस चौकीजवळ वाहने तपासणीसाठी उभी करून ठेवतात. त्या वाहनांच्या मागे रांगा लागून कोंडीत होत आहे, असे प्रवाशांनी सांगितले.
काटई बदलापूर रस्त्यावर काटई येथे शिळफाटा दिशेने जाताना वळण मार्गावर फळ विक्रेते, खाऊची दुकाने आहेत. ही दुकाने हटवून जलवाहिनी भागापर्यंत हा वळण रस्ता रूंद केला तर काटई चौकातील कोंडी कमी होणार आहे. तसेच, काटई चौकात कल्याण दिशेने जाताना बाजुला असलेली फर्निचर आणि इतर दुकाने हटवून तो भाग रूंद केला तर शिळफाटाकडून काटई बदलापूर रस्ता दिशेने जाण्यासाठी येणाऱ्या वाहनांना काटई चौकात उभे राहण्यासाठी पुरेसी जागा उपलब्ध होणार आहे. शासनाने लवकर या भागातील रस्ते बाधितांना भरपाई देऊन या भागातील रस्ता रूंदीकरणातील अडथळा दूर करावा, असे प्रवाशांनी सांगितले.