ठाणे – मेट्रो उड्डाणपूल, नव्या इमारती बांधून ठाणे बदलतय अशा गप्पा एकीकडे मारल्या जात असताना सायंकाळच्यावेळेत गावदेवी परिसरातून घरी परतण्यासाठी रिक्षांचा शोध घेणाऱ्या प्रवाशांचा बुधवारी रात्री झालेला उद्रेक ठाण्यातील राजकीय तसेच प्रशासकीय व्यवस्थेच्या डोळ्यांत अंजण घालणारा ठरला आहे. रेल्वे स्थानकालगतचा गावदेवी परिसर हा रिक्षाने घरी परतू पाहणाऱ्या प्रवाशांसाठी मोठे केंद्र मानले जाते.
मात्र, बऱ्याचदा येथे रिक्षा उपलब्ध होत नाहीत आणि उपलब्ध झाल्या तर भाडे नाकारले जाते असा अनुभव प्रवाशांना दररोज येऊ लागला आहे. वाढती गर्दी पाहून तर काही रिक्षाचालक अव्वाच्या सव्वा दर प्रवाशांना आकारतात. तोंड दाबून सहन कराव्या लागणाऱ्या या त्रासाला ठाणेकर रिक्षा प्रवासी अक्षरश: मेटाकुटीला आले असून येथील प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्था मात्र या प्रश्नावर ढीम्म असल्याचे चित्र आहे.
ठाणे शहरातील लोकमान्यनगर, इंदिरा नगर, यशोधन नगर, सावरकर नगर या भागातील मोठ्या संख्येेने नागरिक कामानिमित्त मुंबई आणि नवी मुंबईत जातात. या भागातून ठाणे स्थानकात पोहोचण्यासाठी सकाळच्या वेळेस रिक्षा किंवा टीएमटी गाड्यांसाठी बऱ्याच वेळ प्रतिक्षा करावी लागते. सायंकाळी दगदगीचा रेल्वे प्रवास करुन आल्यानंतर स्थानक परिसरातून घरी जाण्यासाठी रिक्षा किंवा टीएमटी गाड्या लवकर उपलब्ध व्हाव्या अशी प्रवाशांची अपेक्षा असते. परंतू, प्रवाशांना सायंकाळी टीएमटी गाड्या आणि रिक्षा मिळवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
रेल्वेचा प्रवास, कार्यालयीन कामाचा ताण आणि त्यात सायंकाळी रिक्षा किंवा बस मिळत नसल्याने घरी पोहोचण्यास होत असलेला विलंब यामुळे प्रवासी त्रासले आहेत. गेले अनेक दिवस प्रवासी हे सर्व सहन करत होते. परंतू, बुधवारी सायंकाळी गावदेवी परिसरात रिक्षा पकडण्यासाठी प्रवाशांची इतकी गर्दी असतानाही अनेक रिक्षाचालक रिकाम्या रिक्षा घेऊन जात होते. तर, काही रिक्षा चालकांकडून जास्त पैशांची मागणी केली जात होती. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी सरळ रस्ता रोको करत सर्व वाहनांची वाट अडविली.
लोकमान्य नगर भागात राहणाऱ्या स्नेहा पाटील सांगतात, दररोज सायंकाळी ७ वाजताच्या नंतर गावदेवी परिसरातून लोकमान्य नगरकडे जाणाऱ्या शेअरिंग रिक्षा पकडण्यासाठी अर्धा ते पाऊण तास थांबावे लागते. तेव्हा कुठे रिक्षा मिळते. परंतू, अनेकदा पाऊण तास उलटूनही रिक्षा मिळत नाही. त्यावेळी मीटर रिक्षाचा पर्याय निवडावा लागतो. त्यासाठी राममारुती रोड पर्यंत चालत जावे लागते. बुधवारी रात्री प्रवाशांनी आक्रोश केल्यानंतर देखील रात्री ९.३० ते १० च्या सुमारास प्रवाशांना रिक्षा मिळत नव्हत्या.
प्रवासी प्रतिक्रिया….
गावदेवी ते लोकमान्य नगर शेअरिंग रिक्षा मिळणे फार कठीण झाले आहे. रोज संध्याकाळी कामावरून घरी जायला उशीर होतो. कारण, अर्धा तास तरी, वाट बघावी लागते. अगदी गर्दीच्या वेळीही रिक्षा थांबत नाहीत. यामुळे रोजचा प्रवास त्रासदायक झाला आहे. अनेकांना मजबुरीने चालत किंवा इतर महागड्या पर्यायांचा वापर करावा लागतो.- विशाल जगदाळे
ठाणे स्थानकातून सायंकाळच्यावेळी लोकमान्यनगर कडे जाण्यासाठी टीएमटी सेवा आहे. परंतू, या बसगाड्या उपलब्ध होण्यास देखील विलंब होतो. त्यामुळे मी शेअर रिक्षाने घरी जातो. गेले काही दिवसांपासून शेअर रिक्षा सुद्धा उपलब्ध होत नाहियेत. रिक्षा चालक रिकाम्या रिक्षा घेऊन जातात पण प्रवासी वाहतूक करत नाही. त्यामुळे संताप होतो. रिक्षा पकडण्यासाठी एक तास असाच निघून जातो. यावर काही तरी तोडगा निघाला पाहिजे.- दीपेश जाधव
गावदेवी भागातून रिक्षा पकडणे हे त्रासदायक बनले आहे. २० प्रति प्रवासी भाडे परवडत नाही म्हणून रिक्षा चालकांनी २५ रुपये भाडे आकरण्यास सुरुवात केली. आम्ही देखील त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. तरी देखील सायंकाळच्या वेळी या रिक्षा मिळत नाही. यामुळे अनेकदा मी चालत घरी जाण्याचा मार्ग आवलंबतो. – धर्मेंद्र सरोज
लोकमान्य नगर ला जायला प्रचंड रांग असते. त्यामुळे मी अनेकदा कामगार किंवा ज्ञानेश्वर नगर पर्यंतची रिक्षा पकडतो आणि तिथे उतरून पुढे चालत जातो. परंतू, बुधवारी रात्री रिक्षावले या मार्गांवरचे भाडे देखील नाकारत होते. त्यामुळे सर्व प्रवासी संतापले. वाहतूक विभाग आणि ठाणे महापालिकेने याकडे विशेष लक्ष देऊन यावर उपाय शोधला पाहिजे.- संकेत खैरे