डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रिक्षा वाहनतळावर रिक्षा रांगेत लावण्यावरून दोन रिक्षा चालकांमध्ये वाद झाला होता. या वादातून एका रिक्षा चालकाने दुसऱ्या रिक्षा चालकाची ठाकुर्ली खंबाळपाडा भागात शुक्रवारी रात्री धारदार शस्त्राने हत्या केली. टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्विन बजरंग कांबळे (२८, रा. समतानगर झोपडपट्टी, गोळवली, डोंबिवली) असे खून झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. सुनील गोपाळ राठोड (३५, रा. डोंबिवली) असे खून करणाऱ्या रिक्षा चालकाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री खंबाळपाडा प्रवेशव्दाराजवळ हा खून झाला. मयत अश्विनचा भाऊ आकाश कांबळे याने याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केलीआहे. आकाश नोकरी करतो. आकाश यांचा अश्विन हा लहान भाऊ होता.

हेही वाचा : Jitendra Awhad: “घोडा माझा लाडका नवी योजना”, जितेंद्र आव्हाड म्हणाले, “भ्रष्टाचार एवढा वाढलाय की घोड्याऐवजी खेचरं येतील”

पोलिसांनी सांगितले, मयत अश्विन बजरंग कांबळे आणि सुनील राठोड हे दोघेही रिक्षा चालक आहेत. ते डोंबिवली रेल्वे स्थानक ते खंबाळपाडा भागात रिक्षेने प्रवासी वाहतूक करून उपजीविका करतात. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रिक्षा वाहनतळावर रिक्षा रांगेत उभे करण्यावरून अश्विन आणि सुनील राठोड यांच्यात वाद झाला होता. माझा क्रमांक रांगेत असताना तू मध्ये का घुसला. यामुळे प्रवासी मिळण्यास आता उशीर होईल, असे या भांडणाचे किरकोळ कारण होते.

या वादातून त्यांच्यात धुसफूस सुरू होती. सुनीलने अश्विनला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता. मयत रिक्षा चालक अश्विन कांबळे शुक्रवारी रात्री खंबाळपाडा प्रवेशव्दार येथून रिक्षा घेऊन जात असताना सुनील राठोडने ते पाहिले. राठोडने आपली रिक्षा तात्काळ मागे फिरवून त्याने अश्विनच्या रिक्षेचा पाठलाग सुरू केला. अश्विनला खंबाळपाडा प्रवेशव्दाराजवळ गाठले. तेथे त्याच्याशी भांडण उकरून काढून सुनीलने रिक्षेतील लोखंडी सळई बाहेर काढून अश्विन कांबळेला काही कळण्याच्या आत त्याच्यावर लोखंडी सळईने प्रहार करून त्याला जागीच ठार मारले. अचानक घडलेल्या या प्रकाराने परिसरातील दुकानदारांनी घाबरून दुकाने बंद केली. पादचारी परिसरातून पळून गेले. एकही पादचारी हा प्रकार सुरू असताना अश्विनच्या बचावासाठी पुढे आला नाही.

हेही वाचा : बदलापूर: उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे कोंडी वाढली; पूर्व पश्चिम प्रवासाठी एक तासाचा काळ, प्रवासी हैराण

टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांना ही माहिती समजात ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी घटनास्थळी भेट दिली. अश्विनला तातडीने पालिका रुग्णालयात नेण्यात आले. तत्पूर्वीच तो मरण पावला होता.

हेही वाचा : कडोंमपातील खंडणीखोर कामगार विनोद लकेश्री निलंबित, आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची कठोर कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिक्षा चालकांकडे दांडके

कल्याण, डोंबिवलीतील बहुतांशी रिक्षा चालकांच्या रिक्षांमध्ये लोखंडी सळई, लाकडी दांडके, स्ट्म्प लपवून ठेवलेले असतात. वाहन कोंडी किंवा इतर वाहन चालकाशी वाद झाला की मग हे रिक्षा चालक ही अवजारे बाहेर काढून त्याचा उपयोग हाणामारीसाठी करतात. वाहतूक पोलीस, पोलीस आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकांच्या वाहनाची तपासणीची मोहीम सुरू करून अशाप्रकारची अवजारे रिक्षेत ठेवणाऱ्या चालकांवर कारवाईची मागणी प्रवाशांकडून होत आहे.