Aapla Dawakhana : ठाणे : ठाणे महापालिकेचा आपला दवाखाना उपक्रम कंत्राट संपल्यामुळे बंद करण्यात आला असला तरी, त्याऐवजी केंद्र शासनाच्या योजनेतून ४३ नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे तर, राज्य शासनाच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेत १२ दवाखाने सुरू करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला होता. यापैकी तीन आरोग्य मंदिरांना भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी दुपारी अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, ती बंद असल्याचे आढळले. यावरून आमदार केळकर यांनी संताप व्यक्त केला.

आपला दवाखाना हा उपक्रम बंद करून ठेकेदाराने कार्यरत डॉक्टर आणि कर्मचारी यांचे पगार थकविल्याचा मुद्दा आमदार केळकर यांनी उपस्थित केला होता. या संदर्भात आमदार केळकर यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, ठेकेदाराचा काळ्या यादीत समावेश केला असून डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांना थकीत पगार दोन दिवसांत दिला जाणार असल्याचे आश्वसन आयुक्तांनी दिल्याचे केळकर म्हणाले होते.

आपला दवाखाना बंद झाला असला तरी त्याऐवजी केंद्र शासनाच्या योजनेतून ४३ नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे तर, राज्य शासनाच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेत १२ दवाखाने सुरू करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिल्याचे केळकर म्हणाले होते. या भेटीनंतर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी दुपारी अचानक तीन आरोग्य मंदिरांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली, त्यावेळी ती बंद असल्याचे आढळून आले.

आरोग्य मंदिरे बंदावस्थेत

आजच माझी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासोबत बैठक झाली. आयुक्तांनी सांगितले की ठाण्यात एकूण ४३ आरोग्य मंदिरे सुरू असून लवकरच आणखी २४ म्हणजे ६७ मंदिरे सुरू होणार आहेत. मात्र मी प्रत्यक्ष पाहणी केली असता कोपरीतील सावरकरनगर भागातील मीठबंदर रोडवरील आरोग्य मंदिर बंद आढळले. ज्या वेळेस हे मंदिर सुरु असावे त्या वेळेस बंदावस्थेत दिसली. समोर कचरा, अस्वच्छ परिसर आणि दरवाजे बंद अशी वस्तुस्थिती आहे, असे आमदार केळकर म्हणाले.

क्रूर चेष्टा थांबवावी

आरोग्य मंदिराच्या नावाखाली ठाणेकरांची दिशाभूल आहे. ही फसवणूक माझी नाही, तर ठाण्यातील गोरगरिबांची आहे. महापालिकेने योग्य नियोजन न करता घाईगडबडीत उद्घाटने करून जनतेची थट्टा केली आहे. जी मंडळी फीत कापतात, त्यांनी ही क्रूर चेष्टा थांबवावी, असे केळकर म्हणाले.

नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे

धर्मवीर नगर, आनंद विहार सोसायटीजवळ, दामिल नाका, अमिनाबाद एसटीपी प्लॉटजवळ, भारत गिअर कंपनीजवळ, गायमुख, कृष्णा नगर, कोपरी पूर्व शाळा क्र. ३४, बारा बंगला प्रवेशद्वार, शास्त्रीनगर, फुलपाखरू उद्यानासमोर, जयभीम नगर-१, कळवा -९० फूट रोड, उथळसर प्रभाग समिती कार्यालयामागे, कासारवडवली, गावदेवी-मुंब्रा, मिठबंदर, जयभीम नगर-२, बाटा कम्पाऊंड, कोंकणीपाडा, किसन नगर, घासवाला कम्पाऊंड, दातीवली, साबेगाव, सैनिक नगर, आनंद नगर जकात नाका, वागळे इस्टेट, विटावा, रुपादेवी पाडा, साठे नगर, चांद नगर, पडले गाव, शीळ अग्निशमन केंद्र, खडी मशीन, हाजूरी, कोपरी प्रसुतीगृह, खिडकाळी, आदिवासी उद्यान, आझादनगर, मीनाताई ठाकरे प्रसुतीगृह, कोपरी डायलिसीस सेंटर, राबोडी कत्तल खाना, आतकोनेश्वर या ठिकाणी असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला होता.