ठाणे – जेवणासाठी पैसे दिले नाही म्हणून एका अनोळखी व्यक्तीने उबर चालकावर ब्लेडने हल्ला केल्याची घटना भिवंडीतील काल्हेर भागात उघडकीस आली आहे. याप्रकरणी उबर चालकाने नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे त्या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
तोफीक रियाज खान (२३) असे उबर चालकाचे नाव आहे. तोफीक हे २५ जून रोजी दिवा येथून प्रवासी घेऊन काल्हेर रेती बंदर रोड येथे आले होते. प्रवासी सोडल्यानंतर ते त्या परिसरातील पाईप लाईनजवळील लॉन्ड्रीसमोर थांबले होते. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ आला आणि त्यांच्याकडे जेवणासाठी ५०० रुपयाची मागणी करु लागला. तोफिक यांनी त्या व्यक्तीला माझ्याकडे पैसे नाही असे सांगितले. त्यावेळी त्या व्यक्तीने रागात तोफिक यांना शिवीगाळ करत ब्लेडने त्यांच्या डाव्या गालावर आणि मानेच्या उजव्या बाजूला वार केला.
या हल्ल्यात तोफीक यांच्या गालावर गंभीर जखम झाली. या हल्ल्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला. जखमी अवस्थेत तोफीक यांनी नारपोली पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.