ठाणे : जाहीरात हक्क देऊन त्या बदल्यात शौचालय उभारणीसंबंधीचे ठाणे महापालिकेने राबविलेले धोरण गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वादात सापडत आहे. याच उपक्रमांतर्गत बाळकुम येथे उभारलेल्या स्वच्छतागृहाला कुलूप लावून ठाणेकरांची गैरसोय केली जात असतानाच त्या स्वच्छतागृहावर उभारलेल्या जाहिरात फलकावर जाहिराती प्रदर्शित करून लाखोंची कमाई केली जात असल्याची बाब पुढे आली आहे. याप्रकरणी मनसेने ठाणे महापालिकेच्या जाहीरात विभागाला पत्र देऊन जाहीरात कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे.
ठाणे शहरातील नागरिकांना रस्त्याकडेला स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पालिकेने जाहीरात हक्क देऊन त्या बदल्यात स्वच्छतागृह उभारणीचे धोरण राबविले. या उपक्रमात काही ठिकाणी शौचालयांची उभारणी करण्याआधीच जाहिरात फलकांची उभारणी ठेकेदारांनी केली होती आणि त्यावर जाहीराती प्रदर्शित करून कमाई सुरू केली होती.
शहरातील मोक्यांच्या जागेवर हा प्रकार सुरू असतानाही पालिकेच्या जाहिरात विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत होते. याबाबत तक्रारी येऊ लागल्यानंतर हा उपक्रम वादात सापडला होता. असे असतानाच, याच उपक्रमांतर्गत बाळकुम येथे उभारलेल्या स्वच्छतागृहाला कुलूप लावून ठाणेकरांची गैरसोय केली जात असतानाच त्या स्वच्छतागृहावर उभारलेल्या जाहिरात फलकावर जाहिराती प्रदर्शित करून लाखोंची कमाई केली जात असल्याच आरोप मनसेचे ठाणे उपशहर अध्यक्ष हेमंत मोरे यांनी केल्याने हा उपक्रम पुन्हा वादात सापडला आहे. याप्रकरणी त्यांनी ठाणे महापालिका जाहिरात विभागाकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे.
ठाणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून ठाण्यात काही ठिकाणी स्वच्छतागृहे बांधून त्यावर जाहिरात फलकांचे सापळे उभारण्याची परवानगी ठाणे महापालिकेने दिली आहे. स्वच्छतागृहांवर मोठे जाहीरात फलक कंत्राटदाराने उभारले. कंत्राट मिळालेल्या कंपनीचे पहिले कर्तव्य ठाणेकरांची गैरसोय होऊ नये असे असताना बाळकुम नाक्यावर असलेले शौचालय जवळपास गेल्या वर्षभरापासून बंद आहे. शौचालयावर असलेल्या फलकावर जाहिराती मात्र दणक्यात चालू आहेत.
मेट्रोच्या कामामुळे हे शौचालय बंद असल्याचे पोस्टर शौचालयावर लावण्यात आले आहे. शौचालय बंद असताना जाहिरात करण्याची परवानगी या कंपनीला कुणी दिली, असा प्रश्न मोरे यांनी उपस्थित केला आहे. बाळकुम नाका हा परिसर वर्दळीचा परिसर आहे. शौचालय बंद असल्यामुळे दररोज शेकडो नागरिकांची गैरसोय होत आहे. शौचालय बंद असताना जाहिरात करण्याचा कोणताही अधिकार जाहिरात कंपनीला नाही, असे मोरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
एकीकडे करदाते त्रस्त आहेत मात्र जाहिरातदार कंपन्या लाखो रुपये कमवून मस्त आहेत. ठाणे महानगरपालिका ठेकेदारांची, कंत्राटदारांची नसून करदात्यांची, ठाणेकरांची आहे, हे दाखवण्याची हिच ती वेळ आहे. त्यामुळे बाळकुम येथील शौचालय बंद असताना त्यावर जाहिरात करणाऱ्या कंत्राट कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.