ठाणे : ठाण्यात खड्ड्यांमुळे वाहतुक कोंडी होत असल्याने नगारिक त्रस्त झाले असताना, आता या खड्डे बुजविण्यासाठी टाकण्यात आलेली वाळू रस्त्यावर पसरू लागली आहे. त्यामुळे दुचाकी आणि हलकी वाहने घसरून अपघाताची भिती व्यक्त केली जात आहे. खड्डे भरणी करताना पसरणारी वाळू हटविण्याची मागणी प्रवासी करू लागले.
ठाणे शहरातून दिवसाला हजारो जड अवजड वाहने आणि हलक्या वाहनांची वाहतुक होते. ठाणे शहरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मेट्रो मार्गिका निर्माण कामे, आनंदनगर ते साकेत उन्नत मार्गिका, घोडबंदर मार्गावरील सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यात सामावेशीकरण, कासारवडवली चौकातील एका मार्गिकेच्या निर्माणाची कामे अशा विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या कामांमुळे अनेक ठिकाणी मार्गावरोधक उभारण्यात आले. त्यामुळे मार्गिका अरुंद झाल्याने त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होत असतो. त्यातच, गेल्याकाही दिवसांपासून सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे शहरातील घोडबंदर मार्गासह काही मुख्य रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. या खड्ड्यांमुळे दररोज वाहन चालकांना वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो.
नोकरदार, शाळकरी मुले कोंडीत अडकल्याने त्याचा शारिरीक आणि मानसिक त्रासही होतो. खड्ड्यांमुळे टीका झाल्यानंतर संबंधित प्राधिकरणाने घोडबंदर भागात खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. परंतु काही ठिकाणी वाळूचा वापर करुन तात्पुरते खड्डे बुजविण्यात येत होते. त्यामुळे पाऊस सुरु झाल्यानंतर ही वाळू खड्ड्यातून बाहेर पसरु लागली असून अपघाताची भिती आता व्यक्त केली जात आहे. वाळू रस्त्यावर पसरत असल्याने दुचाकी, सायकल घसरुन अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घोडबंदर मार्गावर खड्डे बुजविल्यानंतर काही वेळातच पुन्हा खड्डे तयार होतात. रस्त्याची वेळच्या -वेळी दुरुस्ती केली असती तर ही वेळ आली नसती. – नितीन साबळे, प्रवासी.