ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघातून शिंदेच्या सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के तर, उबाठाचे उमेदवार राजन विचारे हे निवडणुक लढवित असले तरी, येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात खरी लढत असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात होणारी ही निवडणुक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात असून हा गड राखण्यासाठी बैठका घेण्यापाठोपाठ आता प्रचार मिरवणुकांच्या माध्यमातून ते स्वत: मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे आजवर वर्चस्व राहिले आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी जिल्ह्यातील घराघरात शिवसेना पोहचविली. म्हणूनच ‘आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला’ अशी घोषणा दिली जाते. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याचे नेतृत्व केले. शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातून मोठे समर्थन मिळाले. असे असले तरी शिवसेेनेतील बंडानंतर जिल्ह्यात पहिलीच निवडणुक होत आहे. महायुतीच्या जागा वाटपात ही जागा आपल्याकडेच ठेवण्यास मुख्यमंत्र्यांना यश आले असून याठिकाणी त्यांनी पक्षाचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली आहे. जागा वाटपावरून भाजप आणि सेनेत नाराजी नाट्य रंगले होते. ते शमल्यानंतर आता महायुतीचे नेते प्रचारात उतरल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : डोंबिवलीत रस्त्यावर चक्कर येऊन पडलेल्या बेशुध्द महिलेला लुटले

मतदार संघातून शिंदेच्या सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के तर, उबाठाचे उमेदवार राजन विचारे हे निवडणुक लढवित असले तरी, येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात खरी लढत असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही सेनेकडून ही जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही सेनेत आरोप-प्रत्यारोपाची लढाई रंगली आहे. त्याचबरोबर आनंद दिघे यांचा खरा शिष्य कोण यावरूनही वाद रंगला आहे. शिवसेनेतील बंडानंतर ठाण्याचा गड कोण राखणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी ठाणे लोकसभा मतदार संघ हा मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात येतो. यामुळे ही निवडणुक मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपुर्वी बैठका घेतल्या होत्या. त्यानंतर किसननगर येथील प्रचार मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यापाठोपाठ गुरुवारी नवी मुंबई येथील बेलापूर भागातील प्रचार मिरवणुकीत सहभागी झाले होते. तर, सायंकाळी ते कोपरी पाचपखाडी येथील मिरवणुकीत सहभागी होणार होते. यामुळे बैठका घेण्यापाठोपाठ आता प्रचार मिरवणुकांच्या माध्यमातून ते स्वत: मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.