ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावर पावसाळ्यात खड्डे पडल्याने वाहतुकदारांना त्रास होत आहे. त्यामुळे हा मार्ग कोणाच्या अख्यारित आहे, हे आम्ही पाहात नाही. त्याऐवजी सर्व विभाग एकत्र मिळून काम करत आहेत. मुंबई नाशिक महामार्गावर खड्डे बुजविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या कामांमध्ये कोणी अडथळा आणल्यास थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना वाहतुक कोंडीत अडकावे लागत आहे. येथील खड्डे आणि कोंडीच्या समस्येविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंत्रणांच्या बैठका घेतल्या होत्या. तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीचे नियमन करणे आणि खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी दुपारी एकनाथ शिंदे यांनी मुंबई नाशिक महामार्गावरील आनंद नगर ते आसनगाव येथील रस्त्याची पाहाणी केली. तसेच रस्ते कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ज्या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. तिथे क्विक रॅपिड सेटिंग हार्डनर काँक्रीट या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे खड्डा बुजविल्यानंतर तेथून दोन तासांत वाहतुक सुरू होऊ शकते असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कामामध्ये कोणीही अडथळा आणल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. हा प्रश्न लाखो प्रवाशांचा आहे. काही ठिकाणी रस्ते अरुंद झाले आहेत. वासिंद, जिंदाल, आसनगाव येथील मुख्य पुलांवरील खड्डे देखील याच पद्धतीने दुरुस्त करण्यात येणार आहे असेही शिंदे म्हणाले. रस्ते दुरुस्ती कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये. मनुष्यबळ आणि यंत्रणांचा वापर करून येथील रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या. रेल्वे प्रशासनाकडून आसनगाव येथे रेल्वे पुलाचे काम सुरू आहे. या कामास झालेल्या दिरंगाई वरून त्यांनी नाराजी व्यक्त करीत संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याच्या सूचना केल्या.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात उद्या उद्धव ठाकरेंचा ‘भगवा सप्ताह’, विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाची सप्ताह मोर्चेबांधणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई नाशिक महामार्गावरील लहान आकाराचे खड्डे बुजविण्यासाठी जीओ पाॅलिमर सिंथेटिक या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. तर मोठ्या आकाराच्या खड्ड्यांसाठी क्विक रॅपिड सेटिंग हार्डनर काँक्रीट या तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. हे तंत्रज्ञान पावसाळ्यातही वापरता येऊ शकेल अशी माहिती ठेकेदारांनी दिली.