प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार इच्छूकांकडून अर्ज भरण्यास सुरुवात
ठाणे : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले असले तरी आगामी महापालिका निवडणुका हे तिन्ही पक्ष एकत्रित आघाडीत लढवतील अशी शक्यता वर्तविली जात असतानाच, ठाण्यात मात्र वेगळे चित्र दिसून येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या सुचनेनंतर ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली असून त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक प्रभागांमध्ये उमेदवारांची चाचणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी इच्छूक उमेदवारांचे अर्ज भरून घेण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे ठाण्यात काँग्रेसचा एकला चलो रे ची भूमिका घेतली की काय अशी चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे.

राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. शिवसेनेतील बंडखोरीमुळे हे सरकार अडीच वर्षात कोसळले. शिवसेनेतील बंडखोरीच्या केंद्रस्थानी असलेले एकनाथ शिंदे आणि भाजपने एकत्रित येऊन नवे सरकार स्थापन केले. या राजकीय घडामोडीनंतरही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्रित राहून राज्यातील महापालिका निवडणुका आघाडीतच लढतील अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, काँग्रेस पक्षाने एकला चलो रे चा भूमिका घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना एक पत्र पाठविले आहे. त्यात महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सांगत निवडणुकांच्या तयारीला लागण्यास सांगण्यात आले आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेनुसार निवडणुक लढविण्यास इच्छूक असलेल्या उमेदवारांचे अर्ज भरून घेण्यास सांगण्यात आले असून त्याचबरोबर खुल्या प्रवर्गातील इच्छूकांकडून ३५०० रुपये, मागास वर्गातील इच्छूकांकडून २५०० रुपये आणि महिला इच्छूकांकडून २५०० रुपये शुल्क अर्जासोबत घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागातील इच्छूक उमेदवारांकडून ठाणे काँग्रेसने अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली असून यानिमित्ताने प्रत्येक प्रभागात उमेदवारांची चाचपणी सुरु करून एकप्रकारे एकला चलो रे चीच भूमिका यामागे दिसून येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाण्यातील काँग्रेसने यापूर्वीच आगामी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार प्रत्येक प्रभागात काँग्रेस पक्षातून निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्याची संख्या मोठी आहे. ज्याप्रमाणे काँग्रेस पक्षाकडून सूचना येतील, त्याच पद्धतीने काँग्रेस पक्ष आपली भूमिका निश्चित करेल. – विक्रांत चव्हाण ,ठाणे शहराध्यक्ष, काँग्रेस