ठाणे : राज्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले असून सोयाबीन, मका, कापूस, भात आणि कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीला आलेली किंवा काढणी करून ठेवलेली पिके पावसाने भिजून सडू लागली आहेत, तर अनेक ठिकाणी कोंब फुटल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी मोठी घोषणा केली आहे.

ठाण्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवनघाट येथे ५१ फूट उंच भव्य विठ्ठल मूर्तीचा अनावरण कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत मोठी घोषणा केली आहे. या सोहळ्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजचा दिवस ठाणेकरांसाठी पवित्र आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात आपण भगवान पांडुरंगाची सेवा करतो, पण आज तुमच्या सर्वांच्या रूपाने पांडुरंग येथे उपस्थित आहे. पांडुरंगाची ५१ फूट उंच अशा भव्य मूर्तीची स्थापना ठाण्यात झाली आहे. हे कार्य प्रताप सरनाईक आणि त्यांच्या टीममुळे शक्य झाले. ठाणेकर भाग्यवान आहेत, असे शिंदे म्हणाले.

‘काऊ मॅन’ पदवी माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट

मी मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. गोमातेला राज्य मातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. शंकराचार्यांनी मला ‘काऊ मॅन’ ही पदवी दिली आणि ते माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी वारकरी आणि शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. लहानपणी आजी-आजोबा, आई-वडिलांसोबत पंढरपूरला जात होतो. आज उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर विठ्ठल भक्त म्हणून येथे आलो आहे, असे शिंदे म्हणाले.

सर्व खर्च शिवसेना करेल

वारकरी दिंड्यांना अनुदान, विमा आणि वाहन टोलमुक्ती हे महायुती सरकारनेच केले. पंढरपूरमध्ये स्वच्छता, पाणी, मोबाईल सुविधा, शौचालये उपलब्ध केली आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने सरकार मदत करेलच. पण ज्यांच्या घरी लग्न ठरले आहे ते लग्न मोडणार नाही; सर्व खर्च शिवसेना करेल,” असे शिंदे म्हणाले. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय देखील महायुती सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले. प्रताप सरनाईक यांनी पूरग्रस्त भागात १०१ गायी दान केल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुकही त्यांनी केले.