बदलापूरः उल्हास आणि वालधुनी नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात आता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने नद्यांना मिळणाऱ्या नाल्यांची माहिती मिळवली आहे. कोणता नाला कोणत्या दुसऱ्या नाल्याला मिळतो, कोणता नाला उल्हास आणि वालधुनी नदीला मिळतो, त्याचे भौगोलिक ठिकाण, त्यांचे अंक्षांश, रेखांश अशी सर्व माहिती मंडळाने संकलीत केली आहे. बदलापूर ते कल्याणपर्यंतच्या या नाल्यांचे सर्वेक्षण झाले असून या नाल्यातील घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांमुळे येत्या काळात त्यातून कोणते घटक वाहतात हेदेखील स्पष्ट होणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील वालधुनी नदीची प्रदुषणामुळे गटारगंगा झाली आहे. उल्हासनदीत दिवसेंदिवस मिसळणारे सांडपाणी आणि प्रदुषणकारी घटकांमुळे नदीचेही प्रदुषण वाढले आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून उल्हास नदीत जलपर्णीची निर्मिती होते आहे. परिणामी पाण्याची पाणी घटण्यासोबतच अनेक समस्या नदीत वाढल्या आहेत. त्यामुळे उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यासाठी नुकतीच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून जलपर्णी यंत्रे आणून ती हटवण्यात आली होती.
यासोबतच उल्हास नदी आणि वालधुनी नदीच्या पुनरूज्जीवनासाठी राज्याचे अपर मुख्य सचिव असिम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर आराखडात तयार करण्यावर एकमत झाले होते. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळ आणि शासकीय संस्थांचा यात सहभाग घेण्यावरही निश्चिती झाली होती. त्या जोडीला प्रदुषण नियंत्रण मंडळाने उल्हास आणि वालधुनी नदीमध्ये मिसळणाऱ्या नाल्यांचे सर्वेक्षण सुरू केले होते. सुरूवातीला या नाल्यांतील पाण्याचे नमुने घेण्यात आले. त्याचा अहवाल आल्यानंतर नाल्यांमध्ये कोणत्या प्रकारचे सांडपाणी मिसळते आहे याचा उलगडा होणार आहे. सोबतच मंडळाने नाल्यांची इत्युंभूत माहिती संकलनाचे कामही सुरू केले होेते. नुकतेच ते काम पूर्ण झाले आहे.
नाल्यांची कोणती माहिती मिळाली
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने बदलापूर ते कल्याणपर्यंतच्या नाल्यांचे सर्वेक्षण केल. नेमके किती नाले अस्तित्वात आहेत. त्या नाल्यांचे क्षेत्रफळ किती आहे. नाल्यांचे स्वरूप काय आहे त्याचे भौगोलिक चिन्हांकन, त्यांचे भौगोलिक टँगिंगही यात करण्या आले आहे. कोणता नाला कोणत्या नाल्यात मिसळतो, पुढे मुख्य नदीला कोणता नाला जाऊन मिळतो. त्यांचे अक्षांश आणि रेखांशही नमूद करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सर्वेक्षणाचा उपयोग काय
नद्यांच्या प्रदुषणात नाल्यांमधून मिसळणारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी महत्वाचा घटक असल्याचे दिसून आले. त्यामुळे या नाल्यांना नदीत मिसळण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. अशावेळी प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणाचा उपयोग होईल. तसेच कोणता नाला सर्वाधिक प्रदुषणकारी घटक वाहून नेतो याचीही माहिती मिळू शकणार आहे. त्यानुसार नाले रोखून त्यांच्यावर प्रक्रिया करणे सोपे होणार आहे.