ठाणे : येथील नामांकित राजवंत ज्वेलर्स दुकानातून १ कोटी ५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सेल्समनला नौपाडा पोलिसांनी मोठ्या शिताफिने अटक केली आहे. दारु पिण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने त्याने ही चोरी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्याने एक दिवसांची सुट्टी घेतल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला असून या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत.

राहुल जयंतीलाल मेहता असे अटक करण्यात आलेल्या सेल्समनचे नाव असून तो ठाण्यातील गावदेवी मैदानाजवळील अशोका हाईटस इमारतीत राहतो. तो ठाण्यातील डाॅ. मुस रोड भागात असलेल्या राजवंत ज्वेलर्समध्ये सेल्समन म्हणून काम करीत होता. दुकानातील विक्रीकरिता दिलेले दागिन्यांचा दररोज त्याला हिशोब द्यावा लागत होता आणि तो त्याच्या लाॅकरमध्ये ठेवत होता. मालक सुरेश पारसमल जैन यांचा त्याच्यावर विश्वास होता आणि यामुळेच त्याने दिलेला हिशोब योग्य असल्याचे ते मानत होते. परंतु ८ मार्च २०२३ रोजी राहुल हा कामावर आला नसल्यामुळे त्याचे काम दुसऱ्या सेल्समनकडे सोपविण्यात आले. त्यावेळी १ कोटी ५ लाख किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन राहुल फरार झाल्याचे मालकाच्या निदर्शनास आले.

हेही वाचा : ठाणे शहरातील तीनशे सीसीटिव्ही कॅमेरे बंद, कक्षातील संबंधित कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी घेतले फैलावर

याप्रकरणी मालक सुरेश जैन यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलिस निरिक्षक (गुन्हे) शरद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक मंगेश भांगे यांच्या पथकाने तपास करून राहुलला मिरारोड येथून अटक केली.

बेपत्ता झाल्याची तक्रार

पोलिसांची पथकाने राहुलच्या घरी जाऊन तसेच नातेवाईकांकडे चौकशी केली असता, तो ८ मार्चपासून कामावर जात नसल्याचे समोर आले. तसेच १५ मार्चपासून राहुल हा बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने नौपाडा पोलिस ठाण्यात दिली होती. यावरुन दुकानात केलेली चोरी उघड होईल या भितीने राहुल मोबाईल बंद करुन पसार झाल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. तो मिरा रोड, मुंबई, इंदौर, गुजरात अशा वेगवेगळया ठिकाणी फिरत होता आणि पोलिसांच्या पथकाला गुंगारा देत होता. तो मैत्रीणीला भेटण्यासाठी मिरारोड येथे येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली.

हेही वाचा : प्रवाशाच्या व्हिडिओमुळं मुंबई ट्रेनमधील मोबाइल चोर पकडला आणि एका मृत्यूचंही गूढ उकललं

मौजमज्जेसाठी चोरी

दारु पिण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने तो दुकानातून दागिने चोरून ओळखीच्या सराफांना विकत होता. पहिल्यांदा केलेली चोरी मालकाच्या लक्षात आली नसल्यामुळे त्याने मोठ्या प्रमाणात सोने चोरी करुन परराज्यात स्थायिक होण्याचा मनसुबा आखला होता. त्याआधीच पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या दागिन्यापैकी २६ नेकलेस, २१ कानातील कर्णफुले, ३ गळ्यातील चैन असे सुमारे ६२ लाख १० हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित दागिन्यांबाबत त्याच्याकडे चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली.