ठाणे : मुंबई, ठाण्यात हक्काचे घर व्हावे यासाठी अनेकजण म्हाडा सोडतीच्या प्रतिक्षेत असतात. म्हाडाच्या यंदाच्या सोडतीमध्ये घोडबंदर येथील चितळसर-मानपाडा भागातील घरांच्या सोडतीसाठी अनेकजण प्रतिक्षेत होते. सोमवारी म्हाडाने सोडत काढली. परंतु चितळसरमध्ये घर घेण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेकांचा हिरमोड झाला. या घरांच्या किमती ५१ ते ५२ लाखांच्या घरात गेल्या. चितळसरमधील या इमारतींत तब्बल ८५९ सदनिका आहेत. परंतु हे घर आवाक्याबाहेर असल्याचे सोडतीमध्ये इच्छूक असलेल्या अनेकांनी सांगितले.
चितळसर येथील टिकूजीनीवाडी या भागात म्हाडाच्या घरांसाठी सोडत निघाली आहे. हा भाग निसर्गाच्या सानिध्यात असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी आहे. तसेच या भागात ठाणे- बोरीवली बोगद्याचा प्रकल्प देखील निर्माण होत आहे. म्हाडाची सोडत निघण्यापूर्वी या घरांची मोठ्याप्रमाणात चर्चा झाली होती. ठाण्यात घर असावे यासाठी अनेकांनी या सोडतीची प्रतिक्षा केली होती. चितळसरच्या घरांसाठी अर्ज करायचा असा अनेकांनी प्लान देखील आखले होते. परंतु सोडत जाहीर झाल्यानंतर चितळसरमध्ये घर घेणाऱ्यांचे स्वप्न भंगले. या घरांच्या किमती कमीत-कमी ५१ लाख ८३ हजार ९८० रुपये आणि ५२ लाख ५४ हजार ६९५ रुपये इतके आहे. म्हाडाच्या जाहीरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या सदनिका ३२.६६ चौ. मीटर ते ३३.१० चौ. मीटर इतक्या आहेत. एकूण सदनिका ८६९ इतक्या आहेत.
परिसराचे महत्त्व काय?
टिकूजीनीवाडी हा भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी आहे. त्यामुळे या भागात ठाण्याच्या इतर भागाच्या तुलनेत प्रदूषण कमी असते. या ठिकाणी वन विभागाचे निसर्ग परिचय केंद्र आहे. या निसर्ग परिचय केंद्रात ठाणे शहरातील विविध भागातून नागरिक सकाळी चालण्यासाठी येतात. विविध पक्षी देखील या भागात पाहायला मिळतात. याच भागातून काही मीटर अंतरावर ठाणे महापालिकेचे डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आहे.
वाहतुकीच्या दृष्टीने ठाणे रेल्वे स्थानकापासून हा भाग काहीसा लांब असला तरी येथे मोठ्याप्रमाणात लोकवस्ती आहे. घोडबंदर मार्गावरील वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु आहे. या मेट्रो मार्गिकेचे मानपाडा हे जंक्शन या भागातून वाहनाने पाच ते सात मिनीटांच्या अंतरावर आहे. तसेच ठाण्यापासून बोरीवलीपर्यंतचा प्रवास अतिजलद व्हावा यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून भुयारी मार्गाची निर्मिती केली जात आहे. म्हाडाच्या इमारतीपासून काही मिनीटांवर हा भुयारी मार्ग आहे.