ठाणे : महापालिकेची उद्याने अधिक नागरिक स्नेही करण्यासाठी निसर्ग वाचनालये सुरू करण्यापाठोपाठ पालिका प्रशासनाने आता प्रायोगिक तत्वावर २१ उद्यानांमधील दोन हजार झाडांवर क्यू आर कोड लावले आहेत. झाडांबद्दलची माहिती नागरिकांना सहजपणे मिळावी या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा कोड मोबाईलवर स्कॅन केल्यावर नागरिकांना मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये झाडांची माहिती उपलब्ध होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमांतर्गत ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रस्ते नुतनीकरण, सुशोभिकरण, शौचालये दुरुस्ती, शहर स्वच्छता अशी विविध कामे हाती घेतली आहेत. त्यापाठोपाठ आयुक्त बांगर यांनी ‘चला वाचूया’ हि मोहिम हाती घेतली असून या अंतर्गत शहरात ठिकठिकाणी वाचनालये सुरू करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काही उद्यानात निसर्ग वाचनालये सुरू करण्यात आली आहेत. महापालिकेची उद्याने अधिक नागरिक स्नेही व्हावी या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता प्रायोगिक तत्वावर उद्यानांमधील झाडांवर क्यू आर कोड लावण्याचा उपक्रम पालिकेने हाती घेतला आहे.

हेही वाचा : दीड लाख रुपयांच्या लाचेप्रकरणी अधिकाऱ्यासह तीनजण ताब्यात

‘उद्यानांमधील नावीन्यपूर्ण संकल्पना’ या उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेच्या २१ उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुमारे दोन हजार झाडांवर हे क्यू आर कोड लावण्यात आले आहेत. उद्यानांमधील झाडांबद्दलची माहिती नागरिकांना सहजपणे मिळावी यासाठी झाडांवर क्यू आर कोड लावण्यात आला आहे. हा कोड मोबाईलवर स्कॅन केल्यावर नागरिकांना त्या झाडाबद्दलची माहिती मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. प्रत्येक झाडाची नोंद करून त्यानुसार हे क्यू आर कोड तयार करण्यात आले आहेत. अशाप्रकारे सुमारे दोन हजार झाडांची माहिती संकलित केली गेली आहे. झाडांना कोणतीही इजा पोहोचणार नाही याची दक्षता कोड लावण्यात आले आहेत, उपायुक्त (उद्यान) मिताली संचेती यांनी स्पष्ट केले. नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद, सूचना, अभिप्राय लक्षात घेवून महापालिका हद्दीतील सर्व उद्यानांमध्ये अशाप्रकारे क्यू आर कोड लावण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : “श्रीराम मांसाहारी…”, जितेंद्र आव्हाडांच्या विधानानंतर अजित पवार गटाचे आंदोलन

अशी मिळेल माहिती

झाडावर लावण्यात आलेल्या क्यू आर कोड आपल्या स्मार्टफोन मध्ये स्कॅनरवर स्कॅन करायचा. कोड स्कॅन केल्यावर विकिपीडिया या वेबसाईट वरील लिंक उघडेल. त्यावर क्लिक केल्यावर त्या झाडाची माहिती मिळेल. ही माहिती मराठी व इंग्रजीत मिळू शकेल. माहितीमध्ये झाडाचे नाव, बॉटनिकल नाव, झाडांचे वैशिष्ट्य, उत्पत्तीस्थान आदींचा समावेश आहे.

हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीतील पोलीस ठाण्यांमध्ये या आणि स्वतःच तक्रार नोंदवा

कोणत्या उद्यानात क्यू आर कोड

माजिवडा – मानपाडा येथील ट्रॅफिक पार्क, कै. शांताराम विश्राम शिंदे जैवविविधता उद्यान. वर्तक नगर येथील कै. प्रमोद महाजन निसर्ग उद्यान, कै. वसंतराव डावखरे उद्यान, वागळे इस्टेट येथील हँगिंग गार्डन, लोकमान्य नगर – सावरकर नगर कै. धर्मवीर आनंद दिघे साहेब उद्यान. उथळसर येथील कचराळी तलाव उद्यान, ब्रम्हाळा तलाव उद्यान, वृंदावन सोसायटी उद्यान. नौपाडा – कोपरी येथील लोकमान्य टिळक उद्यान, दत्ताजी साळवी निसर्ग शिक्षण केंद्र, श्री गणेश उद्यान, कै. नानासाहेब धर्माधिकारी उद्यान, राम गणेश गडकरी रंगायतन उद्यान, दादोजी कोंडदेव क्रीडांगण उद्यान. कळवा येथील नक्षत्र वन, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय उद्यान, कै. मुकुंद केणी क्रीडा संकुल, खारेगाव तलाव. दिवा येथील खिडकाळी तलाव. मुंब्रा येथील राऊत उद्यान याठिकाणी असलेल्या झाडांवर क्यू आर कोड लावण्यात आले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane municipal corporation 21 gardens qr codes on 2000 trees to give information about tree css
First published on: 04-01-2024 at 10:17 IST