ठाणे – वागळे इस्टेट भागातील एका इमारतीमधील घराला लागलेल्या आगीच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही आग नेमकी कशी लागली याविषयी कोणतीही स्पष्टता नसल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

दिवाळीच्या दिवसापासून आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी आग लागली आहे तर, कुठे शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे. या घटनांमध्ये कोणतिही जिवीत हानी झालेली नव्हती. परंतू, बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास वागळे इस्टेट भागातील शांतीनगर परिसरात प्रथमेश अपार्टमेंट ही चार मजली इमारत आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील रुम नंबर ४२ मध्ये अचानक आग लागली.

यावेळी त्या घरात घर मालक सचिन निकम (४५) हे होते. या घटनेची माहिती मिळताच, महावितरण कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान एक अग्निशमन वाहन आणि एका रेस्क्यू वाहनासह तसेच रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत सचिन निकम हे गंभिररित्या भाजले असल्यामुळे त्यांना तात्काळ कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.