ठाणे, कल्याण डोंबिवली आणि अंबरनाथ पाठोपाठ आता उल्हासनगर शहरातही शिवसेनेच्या १५ माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. आज (बुधवार) गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने ठाण्यातील आनंदाश्रम येथे या नगरसेवकांनी हजेरी लावली. उल्हासनगरात शिवसेनेचे २५ नगरसेवक होते, त्यापैकी १५ नगरसेवक गेल्याने शिवसेनेला भगदाड पडले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या ठाणे जिल्ह्यात त्यांना विरोध होईल असे वाटत नव्हते. त्यानंतर त्यांचे पुत्र खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील उल्हासनगर शहरातच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर हल्ला झाला. जिल्ह्यातला हा पहिला हल्ला होता. यानंतर शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, ज्येष्ठ माजी नगरसेवक धनंजय बोडारे आणि बहुतांश शिवसैनिकांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत आपण शिवसेनेत आणि ठाकरे कुटुंबियांसोबतच असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे उल्हासनगरातून शिंदे गटाला पाठिंबा नाही असेच काहीसे चित्र तयार झाले होते.

अडीच वर्षांपूर्वीच निर्णय घेतले असते तर, आता ही वेळ आली नसती – मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला उद्धव ठाकरेंना टोला!

अखेर बुधवारी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने ठाण्यात आनंदाश्रम येथील आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उल्हासनगर १५ माजी नगरसेवकांनी भेट घेत आपला त्यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यावेळी उल्हासनगर महापालिकेतील माजी नगरसेवक ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर, चरणजी कौर भुल्लर, अंजना म्हस्के, कुलविंदरसिंह सोहोता, स्वप्निल बागूल, माजी महापौर लिलाबाई आशान, मिनाक्षी पाटील, विकास पाटील, शुभांगी बेहेनवाल, जोत्सना जाधव, विजय पाटील, मिनाक्षी पाटील, विकास पाटील आदी माजी नगरसेवकांचा समावेश असल्याची माहिती माजी स्विकृत नगरसेवक अरूण आशान यांनी दिली आहे.

या गटाच्या शिंदे यांना पाठिंबा देण्याने उल्हासनगर शिवसेनेत मोठी फुट दिसून आली आहे. उल्हासनगर शिवसेनेचे २५ नगरसेवक होते. त्यातील १५ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले असून येत्या काही दिवसात इतरही अनेक जन येतील, अशी आशा आशान यांनी व्यक्त केली आहे.