उल्हासनगर : उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उल्हासनगरमधील उबाठा गटातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमात उबाठा गटाचे माजी नगरसेवक शेखर यादव आणि माजी नगरसेविका संगीता सपकाळे यांनी औपचारिकरित्या पक्ष प्रवेश केला. त्यांच्या सोबत उपविभागप्रमुख विनायक खानविलकर, उपशाखाप्रमुख मिलिंद गावडे, तसेच मंगेश पालांडे, संजय भोईर, अनंता अमृते, सुनील जानवलेकर, राज पटेल, साबीर शेख, नितीन सपकाळे, शुभम सपकाळे, आयुष सपकाळे, रजा पीरजादे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी शिवसेनेत सामील झाले.
नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना एकनाथ शिंदे यांनी, “उल्हासनगरच्या विकासासाठी एकसंघपणे काम करणार आहोत,” असे सांगत नव्या कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीत पक्षाच्या बळकटीसाठी सक्रीय होण्याचे आवाहन केले. याआधी काही दिवसांपूर्वी अंबरनाथ येथील मनसेचे माजी नगरसेवक आणि शहर अध्यक्ष यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तर गेल्याच आठवड्यात मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी पक्षात दाखल झाले आहेत. या सलग घडामोडींमुळे आगामी उल्हासनगर पालिका निवडणुकीत शिवसेनेची ताकद लक्षणीय वाढणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. या कार्यक्रमाला कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, मंदार किणी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
कल्याण लोकसभा मतदारसंघात विशेष लक्ष
गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर प्रवेश होत आहेत. विशेषतः कल्याण लोकसभा मतदारसंघात अनेक प्रवेश होत आहेत. खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रवेश होत आहेत. त्यामुळे त्यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात शिवसेना बळकटी देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. या महापालिका आणि नगरपालिका शिवसेनेच्याच ताब्यात होत्या. आताही ती पकड ठेवण्यासाठी प्रयत्न केला जातो आहे.