उल्हासनगरः तुमच्या आधार कार्डचा वापर करून एका व्यक्तीने ८१ कोटींचा घोटाळा केला आहे. त्यामुळे आता तुम्हाला अटक होईल. तुम्हाला पोलिस मारहाण करतील. पायामध्ये खिळे ठोकून बर्फाच्या लादीवर झोपवतील. असे खोटेनाटे सांगून एका व्यक्तीला तब्बल ३ लाख रूपये तातडीने खात्यावर पाठवण्याचे सांगत फसवणुकीचा प्रकार उल्हासनगर शहरात घडला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा डिजीटल अरेस्टचा प्रकार असून याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षात डिजीटल अरेस्टचे प्रकार वाढले आहे. तुमच्या नावे काही वादग्रस्त वस्तू पार्सलमध्ये आल्या आहेत. तुमच्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडले आहेत. तुमच्या खात्यात मोठ्या प्रमाणावर काळा पैसा आला आहे, असे अनेक खोटे गुन्हे सांगत व्यक्तींना आर्थिक जाळ्यात फसवण्याचे प्रकार वाढले आहेत. या अशा प्रकरणातून लाखो रूपयांची आर्थिक फसवणुकही केली जाते आहे.

अनेकदा व्यक्तीला फोन किंवा व्हिडीओ कॉलकरून घाबरवले जाते. समोर पोलिसाच्या गणवेशात असलेल्या व्यक्तिला पाहून अनेकांची बोबडी वळते. त्याचाच गैरफायदा घेतला जातो. व्यक्तिला तातडीने एक खात्याचा क्रमांक देऊन त्यात पैसे पाठवण्यास सांगितले जाते. घाबरलेली, भेदरलेली व्यक्ती क्षणाचाही विलंब न करता दिलेल्या खात्यात पैसे पाठवून देतात. त्यातूनच आर्थिक फसवणूक होती.

अशीच घटना उल्हासनगरात समोर आली आहे. येथील एका व्यक्तिला आरोपीने त्याचा मो.क्रमांक ६१४०९२६५०२७ यावरुन फोन करून आणि मोबाईल क्रमांक ९८८५७९३९४२ यावरुन व्हॉटसॅप कॉल करुन आम्ही मुंबई पोलीस मधुन बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादीचा मोबाईल क्रमांक आणि आधारकार्ड क्रमांक वापरुन नरेश नावाच्या व्यक्तीने ८१ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे अशी खोटी माहिती देण्यात आली. तसेच या प्रकरणात फिर्यादीस अटक करण्याची धमकी देण्यात आली.

यापुढे जात आरोपींनी फिर्यादीला मारण्याची, फिर्यादीचे पायामध्ये खीळे ठोकण्याची, तसेच बर्फाच्या लादीवर झोपवण्याची भिती घातली. यापासून वाचायचे असल्यास सेंन्ट्रल बँक ऑफ इंडीयाच्या आरमान मंन्सुरी या खात्यावर ३ लाख रूपये पाठवण्यास भाग पाडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.