ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोरदार पावसामुळे शहरातील दोन भागांमध्ये गुरूवारी आणि शुक्रवारी संरक्षण भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात गुरुवारी रात्री कळवा परिसरातील सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली तसेच शुक्रवारी दुपारी पोखरण रोड क्रमांक १ येथील वनविभागाची भिंत कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे.
ठाणे शहरातील कळवा येथील गणपतीपाडा परिसरात गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास ओम गणेश सोसायटीची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली. ही भिंत अंदाजे १५ फूट लांब व ५ फूट उंच होती. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. ही घटना घडताच कळवा प्रभाग समिती निहाय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरात धोकापट्टी लावण्यात आले असून संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे, पोखरण रोड क्रमांक १ येथे श्री स्वामी समर्थ मठाच्या समोर शुक्रवारी दुपारी ३.४७ वाजता संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली. येथे रस्त्यालगत असलेल्या वनविभागाच्या संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळला. ही संरक्षण भिंत अंदाजे २० फूट लांब आणि ६ फूट उंच होती. या घटनेची माहिती मिळताच लोकमान्य – सावरकर नगर प्रभाग समिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर कोसळलेली भिंत आपत्ती व्यवस्थापन कक्षातील जेबीसी मशीनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली असून रस्त्यावरील अडथळा दूर करण्यात आला आहे.
उर्वरित कार्यवाही संबंधित विभागामार्फत करण्यात येणार आहे. या दोन्ही घटनांमुळे ठाणेकरांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, सततच्या पावसामुळे शहरातील जुन्या आणि कमकुवत संरचनांवर धोका निर्माण झाला आहे. अशा ठिकाणांची तपासणी करून वेळीच उपाययोजना करण्याची गरज स्थानिक नागरिक व सामाजिक संस्थांकडून व्यक्त केली जात आहे. ठाणे महापालिका प्रशासनाने अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रिपरिप पावसाने ठाणेकरांना झोडपले
ठाणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून पडत असलेल्या रिपरिप पावसाने ठाणेकरांना झोडपले आहे. या पावसामुळे शहरात पूर्व द्रुतगती महामार्ग, मुंबई नाशिक महामार्ग, घोडबंदर भागात वाहतुक कोंडी झाली होती. यामुळे कामावर निघालेल्या नागरिकांना वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.