शहापूर तालुक्यात असलेले आणि मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा आणि मोडक सागर धरणांच्या पाणी पातळीत मागील चोवीस तासाच्या कालावधीत कमालीची वाढ झाली असून दोन्ही धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने धरण परिसरातील १८ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मोडक सागर धरणाची एकूण पाणी पातळी ही १६३.१४७ मीटर इतकी असून ती सद्यस्थितीत १६२.५१ मीटर इतकी झाली आहे. तर तानसा धरणाची एकूण पाणी पातळी ही १२८.६४ मीटर इतकी असून ती सध्या १२५.९७४ मीटर इतकी झाली आहे. तसेच येत्या दोन दिवसात अशाच पद्धतीने धरण परिसरात पाऊस झाल्यास खबरदारी म्हणून गावातील नागरिकांना जवळच्या गावांमध्ये स्थलांतर करण्याची सोय जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.
दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर –
जुलै महिन्याच्या सुरुवाती पासूनच ठाणे जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून गेल्या चोवीस तासाच्या कालावधीत ठाणे जिल्ह्यात ७०.८ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ९६.७ मिमी इतक्या पावसाची नोंद ही शहापूर तालुक्यात करण्यात आली आहे. यामुळे शहापूर तालुक्यातील तानसा आणि मोडक सागर धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून ही दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. यामुळे धरण परिसरात येणाऱ्या भिवंडी तालुक्यातील नऊ आणि शहापूर तालुक्यातील नऊ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे या गावांतील नागरिकांसाठी भिवंडी आणि शहापूर तालुक्यातील सुरक्षित ठिकाणी तात्पुरत्या निवाऱ्याची आणि इतर सुविधांची सोय करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने स्थानिक यंत्रणांना याबाबतचे आदेश दिले आहेत.