ठाणे : यंदा गणेशोत्सवावरील करोनाचे सावट नसले असले तरी नागरिकांना महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. उत्सवासाठी लागणाऱ्या सजावटीच्या साहित्यापासून ते पूजेच्या साहित्यापर्यंत सर्वच वस्तूंच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. सजावटीचे साहित्य १० ते २० टक्क्यांनी आणि पूजेचे साहित्य २० ते २५ टक्क्यांनी महागले आहे, अशी माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली.

यंदा करोनाचा प्रादुर्भाव ओसरला असून निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच सण उत्साहात साजरे करण्याकडे नागरिकांचा कल आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत. कृत्रिम फुलांपासून तयार केलेले सजावटीचे साहित्य, कृत्रिम फुलांच्या माळा, रोषणाईच्या माळा, मखर तसेच पूजेच्या साहित्याने बाजारपेठा सजलेल्या दिसून येत आहेत.  ठाणे तसेच उपनगरातील बाजारपेठेत सकाळपासून नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सजावटीच्या साहित्यापासून ते पूजेच्या साहित्यापर्यंत सर्वच गोष्टी महागल्याचे चित्र आहे. सजावटीचे साहित्य १० ते २० टक्क्यांनी आणि पूजेचे साहित्य २० ते २५ टक्क्यांनी महागले आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च महागला आहे, त्यामुळे या साहित्याच्या दरात वाढ झाली असल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली.

मागील वर्षी ५० ते १५० रुपयांना विक्री करण्यात येणाऱ्या कृत्रिम फुलांच्या माळा यंदा १०० ते २०० रुपयांना विक्री केल्या जात आहेत. तर, पर्यावरणपूरक मखरच्या दरातही १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी ८०० रुपयांने मिळणारा मखर यंदा १ हजार रुपयांना मिळत असल्याची माहिती ठाण्यातील मखर विक्रेते कैलास देसले यांनी दिली.

पूजेचे साहित्य २० ते २५ टक्क्यांनी महाग

पूजा साहित्याच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी ४०० रुपयाने विकला जाणारा पूजेच्या साहित्याचा संच यंदा ६०० रुपयांत विकला जात आहे. तर, ४०० ते ८०० रुपये प्रति किलोने विक्री करण्यात येत असलेली सुटी अगरबत्ती यंदा ५०० ते १००० रुपये प्रति किलोने विकण्यात येत आहे.

बांबू, वुडन ग्रास मखरांचा ट्रेंड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरवर्षी गणेशोत्सव निमित्त बाजारात विविध प्रकारचे मखर विक्रीसाठी उपलब्ध होत असतात. अलिकडे बाजारात पर्यावरण पूरक मखरचा ट्रेंड वाढल्याचे दिसून येत आहे. पुठ्ठा, कागद, कापड यांपासून तयार केलेल्या मखरांसह यंदा बाजारात बांबू पासून तयार केलेले तसेच वूडन ग्रास आणि लेझर लाईटचे मखरही विक्रीसाठी दाखल झाले आहेत.