ठाणे / डोंबिवली : ठाणे जिल्ह्यात वातारणातील बदलामुळे आधीच उकाडा वाढल्याने अंगाची लाहीलाही होत असतानाच, ठाणे, कल्याण-डोंबिवली तसेच आसपासच्या शहरांमध्ये अघोषित भारनियमन सुरू झाले आहे. दिवसा आणि रात्रीही वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तर, तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडीत होत असल्याचा दावा महावितरण करीत आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील तापमान वाढत आहे. उष्णतेची ही लाट आणखी काही दिवस राहील, असा हवामान खात्याचा इशारा आहे. वाढत्या उष्णतेमुळे पंखे, वातानुकूलन यंत्रणांचा वापर वाढल्याने वीजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. परिणामी, महावितरणवरील वीज पुरवठय़ाचा ताण वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि बदलापूर शहरात अधिकृतपणे भारनियमन सुरू करण्यात आले आहे. या दोन्ही शहरांत अधिकृतपणे भारनियमन सुरु करण्यात आले असले तरी ठाणे, कल्याण-डोंबिवली तसेच आसपासच्या शहरांमध्ये मात्र अघोषित भारनियमन केले जात असल्याचे चित्र आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरी भागांत लपंडाव

ठाण्यातील वागळे इस्टेट, पाचपाखाडी, तीन हात नाका, नौपाडा, कोलशेत, मनोरमानगर, बाळकूम, हरिनिवास, राम मारूती रोड, आनंदनगर यांसह अनेक भागांत दुपारच्या वेळेत सातत्याने अर्धा ते पाऊण तास वीज पुरवठा खंडीत होत आहे. या भागांत बाजारपेठ, अनेक मोठय़ा आस्थापना, कंपन्या आणि बँकांची कार्यालये आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने त्यांच्या कामकाजावर परिणाम होत आहे.