कल्याण : मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने मागच्या पाच महिन्यात थोडीही उघडीप दिली नाही. संततधार पावसामुळे घर परिसरातील मोकळ्या भागात, रानवनात भक्ष्यासाठी संचार करणारे इतर प्राण्यांप्रमाणे सरपटणारे सर्व प्रकारचे विषारी, बिन विषारी साप आपल्या बिळात अडकून पडले. महापुराची परिस्थिती आली त्यावेळी हेच प्राणी बिळाबाहेर येऊन जीव वाचविण्याच्या धडपडीत असल्याचे आढळले. आता पाच महिन्यानंतर पावसाने उघडीप दिली आहे. चटके देणारे उन पडू लागले आहे. त्यामुळे निसर्ग नियमाप्रमाणे पाच महिने गारठ्यात काढलेला विषारी, बिन विषारी साप आता आपल्या बिळाबाहेर पडला आहे, अशी माहिती निसर्ग आणि सर्पमित्र राहुल जगन्नाथ यांनी दिली.

पावसाळ्यात साधारण पाऊस असला की हाच जंगल, झुडपे, शेतावरील बांधांमध्ये राहणारा सरपटणारा विषारी, बिन विषारी साप नियमित भ्रमंती करतात. रात्रीच्या वेळेत उजेड दिसेल त्या ठिकाणी उजेडावर येणारे कीटक खाण्यासाठी येतात. काही सरपटणारे साप उंदिर, घुशी यांचा माग काढत दिवसा, रात्री संचार करतात. यावेळचा पाऊस तडाखा देणारा असल्याने या वातावरणाचा अंदाज घेऊन बिळात, कपारीत राहणारे सरपटणारे प्राणी यावेळच्या पावसात अधिक प्रमाणात कोठे आढळले नाहीत. हा सरपटणारा वर्ग आपल्या बिळात दबा धरून होता.

आता परतीचा पाऊस सुरू झाला आहे. मुसळधार पावसाने उसंत घेतली आहे. आणि असह्य उकाडाही सुरू झाला आहे. त्यामुळे दिवसा बिळात दबा धरून बसलेला सरपटणारा साप रात्रीच्या वेळेत उंदिर, कीटक, बेडुक अशा भक्ष्यांसाठी बाहेर पडतो. भक्ष्याच माग बाहेर पडलेला हा विषारी, बिनविषारी साप अनेक वेळा घरांना असलेल्या फटीमधून, घरातील सदस्यांच्या नकळत दार, खिडकीवाडे घरात प्रवेश करतो. रात्रीच्या वेळेत घरातील सदस्य विजेचे दिवे बंद करून झोपले की घरातील कोपऱ्यात, खाटेखाली, बिछान्याच्या आडोशाने दबा धरून बसलेला हा साप घरातून बाहेर पडण्यासाठी घरात संचार करतो. यावेळी तो बिछान्यावर झोपलेल्या नागरिकाच्या संंपर्कात आला की तो बिछान्यावरील चादर, गादीमध्ये दबा धरून बसतो.

झोपेतील सदस्याने चुकून झोपेत कुशीवर वळताना किंवा झोपेत हालचाल करून त्याचा स्पर्श बिछान्यावर दबा धरून बसलेल्या सरपटणाऱ्या विषारी, बिन विषारी केला की मग मात्र स्वताच्या बचावासाठी सरपटणारा साप त्या व्यक्तिला दंश करतो. घरातील वीज दिवे लागेपर्यंत अनेक वेळा साप त्या बिछान्यात खिळून असतो किंवा काही वेळा तेथून तो निसटून गेलेला असतो, असे सर्पमित्र राहुल जगन्नाथ यांनी सांगितले.

त्यामुळे पाऊस काळात आणि पावसानंतरच्या काळात घराला कोठेही फट राहणार नाही. घर परिसरात पालापाचोळा साचू देऊ नये. रात्रीच्या वेळेत घरातील दारे, खिडक्या घट्ट बंद राहतील याची काळजी घर वनराई, ग्रामीण, जंगल परिसरातील नागरिकांनी घेणे आवश्यक आहे, असे जगन्नाथ यांनी सांगितले.

विषारी साप

मण्यार (चूड) सापाने दंश केल्यास त्याचे विष मज्जातंतूवर परिणाम करते. घोणस (कांबळ्या) सापाने दंश केल्यास त्याचे विष रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम करते. फुरसे चावल्यावर रक्ताच्या गुठळ्या होतात. नाग चावल्यास तोंडातून लाळ गळते.