पोर्तुगाल मधून भारतात पर्यटनासाठी आलेल्या एका विदेशी महिलेचा धावत्या एक्सप्रेसमध्ये कल्याण-कसारा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान विनयभंग करणाऱ्या एका लष्करी जवानाला दोन वर्षानंतर अटक करण्यात कल्याण लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. दोन वर्ष पोलीस या आरोपीच्या मागावर होते. अखेर तो कल्याणमध्ये पोलिसांच्या जाळ्यात सापडला.साहिश टी असे आरोपीचे नाव आहे. तो भारतीय लष्कराच्या केरळ तळावर कार्यरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी सांगितले, दोन वर्षांपूर्वी पोर्तुगाल देशाची एक महिला भारतात पर्यटनासाठी आली होती. दिल्ली-मुंबई असे पर्यटन केल्यानंतर १४ फेब्रुवारी २०१९ रोजी गोवा-दिल्ली निजामुद्दीन एक्सप्रेसने प्रवास करत होती. तिच्या सोबतच्या एका प्रवाशाने रात्रीच्या वेळी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. कल्याण-कसारा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. आपल्यासोबत घडल्या प्रकाराची विदेशी महिलेने भारतीय दूतावासाकडे तक्रार नोंदवली होती.

भारतीय दूतावासाकडून ही तक्रार रेल्वेच्या वरिष्ठांकडे गेली होती. हा प्रकार कल्याण-कसारा दरम्यान घडल्याने कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दूतावासाला मधील महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या घटनेचे कोणतेही धागेदोरे पोलीसांकडे नव्हते. त्यामुळे तपासाचे मोठे आव्हान होते. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम शार्दुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. घटना घडल्या दिवसापासून रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही मधील माहिती, महिलेने तक्रारीत आरोपीचे केलेले वर्णन, त्याचे धागेदोरे जुळवत तपास अधिकारी दुसाने यांनी आरोपीचा मोबाईल क्रमांक मिळवला. तो बंद होता.

समाज माध्यममध्ये आरोपीचा शोध घेण्यात येत होता. समाज माध्यममध्ये तपास करत असताना तपास अधिकारी दुसाने यांना विदेशी महिलेने तक्रार केलेल्या आरोपी सारखा एक मिळताजुळता चेहरा आढळून आला. त्याची माहिती काढण्यास त्यांनी सुरुवात केली. तो लष्करी जवान असल्याचे आढळून आले. तो लष्कराच्या केरळ तळावर कार्यरत होता. आपल्या मागावर पोलीस आहेत याची कुणकुण लागताच जवान साहिश टी याने कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. तो फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. तो ही फेटाळण्यात आला.

जामिनासाठी प्रयत्न करत असलेला इसम हाच विदेशी महिलेचा विनयभंग प्रकरणातील आरोपी आहे असा संशय तपास अधिकारी अर्चना दुसाने यांचा बळावला. दुसाने यांनी तपास चक्र आणखी वाढवले. त्यावेळी साहीश कल्याणमध्ये आपल्या नातेवाईकांच्या घरी लपून बसल्याची माहिती दुसाने यांना मिळाली. अखेर सापळा लावून दुसाने यांच्या तपास पथकाने साहीशला तो लपून बसलेल्या कल्याणमधील घरातून अटक केली. पोलिसांच्या या कामगिरीने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian army soldier arrested for molesting foreigner women on train scsg
First published on: 02-03-2022 at 15:50 IST