शहापूर तालुक्यातील खराडे गाव उत्पादन केंद्र बनविण्याचा मानस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापुरी चादर, सातारी ब्लॅन्केट, शाल यांचे महत्त्व थंडीच्या दिवसांत जेवढे जाणवते, तेवढीच गोधडीची ऊबही अंगाची हुडहुडी घालविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.  ग्रामीण लोकजीवनाचे लक्षण असलेल्या या गोधडीला भारतीय शहरात पसंती मिळत आहेच, पण त्याचबरोबर आता सातासमुद्रापार अमेरिकेतूनही मागणी येऊ लागली आहे. शहापूर तालुक्यातील अशाच एका खराडे गावात तयार होणाऱ्या गोधडय़ांना सध्या मोठी मागणी असून त्यामुळे हा परिसर अशा उत्पादनांचे नवे केंद्र बनू लागले आहे.

गोधडय़ांचे प्रकार

सुती कापडांचे कप्पे एकत्र करून, गालीचादार कापड, हलके सुती व अन्य कापडाचे मिश्रण करुन रजई, वेल्वेट, मुलांना आकर्षक वाटतील अशा गमतीजमतीदार गोधडय़ा  महिलांकडून तयार करण्यात येतात. गोधडय़ा धुणी यंत्रामध्ये धुतल्यानंतर त्यांचा गोळा होणार नाही याची गोधडी शिवताना विशेष काळजी घेतली जाते. धुतल्यानंतर गोधडी तात्काळ वाळावी म्हणून सुती कपडय़ाचा प्राधान्याने विचार करण्यात येतो, असे समन्वयक आरती सरोदे यांनी सांगितले. उशांची वेष्टने या महिला करतात. डोंबिवलीतील ‘शलाका युथ ग्रुप’ नि:स्वार्थी भावनेतून शहराच्या विविध भागांत प्रदर्शन भरवीत आहे. गोधडी विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून खराडे गावात एक गोधडी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. कष्टकरी महिलांना कामाची मजुरी म्हणून फुटामागे पैसे देण्यात येतात.

पारंपरिक बिछाना

भारतीयांचा पारंपरिक बिछाना गोधडीने सजला जात होता.  घरातील जुनी झालेली लुगडी, धोतरे साठवून ठेवायची. पावसाळ्यातील भात लागवडीचा हंगाम संपला की  महिला पाच ते सहा महिलांचे गट करून एकेकीच्या घरी जाऊन गोधडय़ा शिवणीचे कार्यक्रम हाती घेत असत. वर्षभर वापरलेल्या गोधडय़ा दिवाळीनंतर शेतातून वाहत असलेल्या किंवा गावच्या नदी, नाल्याकाठी नेऊन धुवायच्या. ऑक्टोबरच्या रखरखीत उन्हात वाळवायच्या आणि पुन्हा त्या वर्षभर वापरायच्या, असा खेडेगावातील उपक्रम असतो.

विक्रमी मागणी

‘ऊर्जा स्वयंसाहाय्यता’ संस्थेच्या माध्यमातून ‘माझगाव डॉक शिपबिल्ड लि.’ आणि ‘कर्वे समाजसेवा’ संस्थेने शहापूर तालुक्यातील खराडे गाव दत्तक घेतले आहे.  खराडे, पडवळपाडा गावांमधील पंधरा महिलांना तंत्रशुद्ध पद्धतीने गोधडी शिवता यावी म्हणून त्यांना जळगाव येथे गोधडी शिवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या महिलांनी शिवलेल्या गोधडय़ांची कल्याण, डोंबिवलीत पाच वेळा प्रदर्शने भरली.   सर्व गोधडय़ा हातोहात संपल्या आहेत. अनेक ग्राहकांनाना कुरिअरने कुरिअरने पाठवून देण्यात येतात, अशी माहिती प्रकल्प समन्वयक स्नेहल नाईक यांनी दिली. एका ग्राहकाने अमेरिकेत पाठविण्यासाठी पंधरा गोधडय़ा खरेदी केल्या आहेत. विविध शहरे, प्रांतांमधून गोधडय़ांना मागणी येऊ लागली आहे.

पारंपरिक पद्धतीत थोडे बदल करून आम्ही  आकर्षक अशा गोधडय़ा शिवतो. त्यांचे धागे ठरावीक माप, अंतरात मारले जातात. कापड स्वच्छ, नवेकोरे वापरले जाते. एक गोधडी एक ते दीड दिवसांत पूर्ण होते. यामुळे गावातील महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

जिजाबाई पडवळ, पडवळपाडा, विक्रेती.

गोधडीची ऊब गोधडी यापूर्वी ज्याने अंगावर घेतली आहे त्याला अधिक माहिती असते. आपण डोंबिवलीतील प्रदर्शनात गोधडय़ा खरेदी केल्या आहेत. पुणे व अन्य शहरांतील नातेवाईकांना भेट देण्यासाठी त्या खरेदी करतो. नातेवाईक मंडळी ही अनोखी भेट पाहून खूश होतात.  गोधडी ही ग्रामीण कलेचा उत्कृष्ट नमुना आहे.

संदीप चांदसकर, ग्राहक, डोंबिवली 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian godhadi export to america
First published on: 17-12-2016 at 01:58 IST