ठाणे: ठाणे महापालिका मुख्यालयातील विविध विभागांचे कार्यालय, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कार्यालये कोणत्या मजल्यावर आणि नेमकी कुठे आहेत, याबाबत अनेक नागरिक अनभिज्ञ असतात. अशा नागरिकांना एका क्लिकवर माहिती उपलब्ध व्हावी यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने पालिका मुख्यालय इमारतीत कृत्रिम बुद्धीमतेवर आधारीत किआस्को यंत्र बसविले आहे. त्यावर नागरिकांना संदेशद्वारे तसेच ध्वनी संदेश द्वारे कार्यालयांची माहिती उपलब्ध होत आहे.

ठाणे महापालिकेची लोकसंख्या २५ लाखांच्या पुढे गेली आहे. शहरात पायाभुत सुविधा पुरविण्याचे काम महापालिका करते. महापालिकेची मुख्य कार्यालय पाचपखाडी भागात आहे. याठिकाणी पालिकेची तीन मजली इमारत आहे. या इमारतीत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि विविध विभागांचे प्रमुख यांची कार्यालये आहेत. याशिवाय, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते यासह पदाधिकारी, पक्ष कार्यालये, पत्रकार कक्ष, अशी कार्यालये आहेत. मालमत्ता कर विभाग, पाणी विभाग, घनकचरा विभाग, आरोग्य विभाग तसेच इतर कार्यालयेही याच इमारतीत आहेत. याशिवाय, शहरात नऊ ठिकाणी प्रभाग समिती कार्यालये आहेत.

पालिका मुख्यालयात अनेक मालमत्ता कर, पाणी देयके भरण्यासाठी येतात. काही वेळेस विविध तक्रारींसाठी नागरिक अर्ज करतात. मात्र, त्यावर उत्तर मिळाले नाही तर नागरिक वरिष्ठांना भेटण्यासाठी पालिकेत येतात. परंतु अनेक नागरिक पालिका मुख्यालयात आल्यानंतर त्यांना विभागांची कार्यालये कुठे आहेत आणि अधिकाऱ्यांची कार्यालये कुठे आहेत, याविषयी माहिती नसते. यामुळे पालिका मुख्यालयात तो विचारपूस करत अधिकाऱ्याचे कार्यालय गाठतो. अनेकदा कार्यालये शोधण्यास नागरिकांचा बराच वेळ वाया जातो.

नागरिकांची ही गैससोय टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर किआस्को यंत्र बसविले आहे. कृत्रिम बुद्धीमतेवर आधारीत या यंत्रावर पालिका मुख्यालयातील ३० विभागांची माहिती नोंद असून हि कार्यालया कोणत्या मजल्यावर आणि कुठे आहेत, याची माहिती नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत.

ठाणे महापालिका मुख्यालयातील प्रवेशद्वारावर किआस्को यंत्र बसविले आहे. यामुळे नागरिकांना पालिका अधिकारी आणि विविध विभागांच्या कार्यालयांची माहिती संदेश तसेच ध्वनी संदेश द्ववारे मिळते. यामुळे कार्यालये शोधण्यात त्यांचा वेळ वाया जात नाही. मालमत्ता कर भरण्याची तारिख कोणती आहे आणि कुठे कर भरू शकतो. तसेच इतर विभागांसंबंधीची मार्गदर्शनपर माहितीही या यंत्राद्वारे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. – सचिन सांगळे, उपायुक्त, ठाणे महापालिका