ठाणे रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाले आणि रिक्षा चालकांमुळे प्रवासी वेठीस धरले जात आहेत. त्यामुळे शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात आमदार संजय केळकर यांनी वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. तसेच स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी त्यांनी पर्यायही सुचविले आहेत. येत्या काही दिवसांत प्रायोगिक तत्त्वावर त्याची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>कल्याण मध्ये वडवली येथे निर्मल लाईफ संकुलाच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून दिवसाला सहा ते सात लाख प्रवासी ये-जा करत असतात. गेल्या काही वर्षांपासून पोलीस, आरटीओ, महापालिका आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या दुर्लक्षामुळे फेरीवाले आणि रिक्षा चालकांकडून प्रवाशांना वेठीस धरले जात आहे. रिक्षा चालकांकडून जवळची भाडी नाकारली जातात. या विविध प्रश्नांसाठी आमदार संजय केळकर यांनी प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस विभाग यांची संयुक्त बैठक घेतली होती. तसेच शुक्रवारी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.या पाहणी दौऱ्यात प्रवाशांची कोंडी कशामुळे होते याचे निरीक्षण करण्यात आले आणि चार बदल करण्याच्या सूचना आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

हेही वाचा >>>ठाण्यात मियावॉकी तंत्रज्ञानाद्वारे वनराई फुलविण्याचे नियोजन ;शहरातील आठ जागांची पालिकेने केली निवड

सध्या असलेला टॅक्सी थांबा रेल्वे स्थानकाच्या बाजूला घेतल्यास टॅक्सी थांब्यातील परिसर मोकळा होणार आहे. त्यामुळे गोखले मार्गाकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाट मोकळी होणार आहे. गोखले मार्गावर कायमस्वरूपी अडथळे बसविण्यात आले आहे. ते काढून टाकल्यास स्थानक परिसरातून डावीकडे या मार्गाने वाहने जाऊन स्थानक परिसर मोकळा राहील. मीटर रिक्षाचे चालक त्यांना पाहिजे त्या ठिकाणचेच भाडे घेतात. त्यामुळे अनेक प्रवासी तिष्ठत उभे असतात. तर शेअर रिक्षा चालकांचीही मनमानी सुरू असते. यात बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांचेही प्रमाण मोठे आहे. या रिक्षाचालकांकडून प्रवासीभिमुख सेवा मिळावी यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी करण्याची सूचना केळकर यांनी केली. तर रिक्षा संघटनेच्या कार्यालयाच्या ठिकाणी २४ तास लक्ष ठेवणारी वाहतूक पोलीस चौकी सुरु करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहणी दौऱ्यात दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी चार पर्याय सुचवले असून प्रायोगिक तत्वावर त्याची अंमलबजावणी करण्याबाबत मी आग्रही भूमिका घेतली आहे. पोलीस आयुक्तांसोबत लवकरच या बदलांबाबत संयुक्त बैठक होणार असून त्याबाबत परिपत्रक काढण्यात येईल.– संजय केळकर, आमदार.