“एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे कधी नव्हे ती राज्याच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. कोण कोणा बरोबर आहे हे कळत नाही. अनेक जण शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. काहींनी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास दाखविला आहे. या गुंत्यामुळे तांत्रिक प्रश्न निर्माण झाले आहेत. ही सगळी सोडवणूक आता न्यायालयातच निकाली निघेल.”, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी येथे व्यक्त केले.

खानदेशी मराठी समाज संघटना, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधान परिषदेवर निवडून आल्याबद्दल खडसे यांच्या सत्काराचा कार्यक्रम कल्याणमध्ये आयोजित केला होता. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

कोण कोणा बरोबर आहे हेच कळेनासे झाले आहे –

खडसे म्हणाले, “शिंदे यांना पाठीमागून कोणी तरी ताकद देत आहे. त्याशिवाय ते एवढे मोठे धाडस करणार नाहीत. भविष्यात त्यांच्या पाठीमागे कोण आहे हे लक्षात येणारच आहे. गेल्या ४० वर्षात कधी पाहिले नाही असे अस्थिरतेचे वातावरण राज्याच्या राजकारणात निर्माण झाले आहे. कोण कोणा बरोबर आहे हेच कळेनासे झाले आहे. मंत्रिमंडळातील अनेक सदस्य बंडात सहभागी होऊन शिंदे यांना समर्थन दिले आहे. काहींनी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास दाखविला आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे राजकीय गुंता राज्याच्या राजकारणात निर्माण झाला आहे. ही सर्व तांत्रिक परिस्थिती न्यायालयाच्या माध्यमातून निकाली निघणार आहे.”, असे खडसे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतापर्यंत माझ्या अनेक चौकशा झाल्या, त्यातून काय निष्पन्न झाले? –

याचबरोबर, आपल्या प्रेमामुळे मी सर्वोच्च पदापर्यंत पोहचलो. कार्यकर्त्यांची ताकद खूप मोठी असते. कल्याणमधील नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी नक्की एक दिवस येईन, असे सांगून खडसे म्हणाले, “प्रामाणिकपणे काम करून सुध्दा अनेक चौकशा माझ्या, कुटुंबीयांच्या मागे लावल्या आहेत. राजकारण कोणत्या स्तराला खेळले जाते. एखादाचा छळ किती केला जातो हे सक्तवसुली संचालनालयाच्या माध्यमातून पाहत आहे. आठवड्यातून सगळे कुटुंब संचालनालयात चौकशीसाठी असते. मला त्रास दिला जात होता हे ठीक. नंतर माझ्या दोन मुली, पत्नी, जावई यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला. जावई माहिती तंत्रज्ञानातील तज्ज्ञ. युरोपात नोकरी. तरीही त्यांनाही या प्रकरणात अडकून तुरूंगात टाकण्यात आले. आतापर्यंत माझ्या अनेक चौकशा झाल्या, त्यातून काय निष्पन्न झाले? मी काय गुन्हा केला? कुठे पैसे खाल्ले, काय घेतले? तुम्ही दाखवा.” असंही खडसे यांनी बोलून दाखवलं.