आठवडय़ाची  मुलाखत : वसंत जाधव, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-४, उल्हासनगर
बदलापूर व अंबरनाथ या दोन शहरांचे किफायतशीर किमतीतील घरांमुळे वेगाने नागरीकरण होत आहे. त्यामुळे या शहरांत गुन्हेगारीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. पोलिसांचे संख्याबळ, त्यांच्यावरील ताण, गुन्हेगारांची गुन्हे करतानाची बदललेली मानसिकता आदी मुद्दे ऐरणीवर आले आहेत. या घडणाऱ्या गुन्ह्य़ांमध्ये सोनसाखळी चोऱ्या, घरफोडय़ा, फसवणुकीचे गुन्हे तसेच राजकीय गुन्हेगारी यांचे प्रमाणही मोठे आहे. शहरातील या घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्नशील असलेले उल्हासनगर परिमंडळ -४ चे पोलीस उपायुक्त वसंत जाधव यांच्याशी बदलापूर व अंबरनाथ भागात वाढत्या गुन्हेगारीसंदर्भात तसेच पोलिसांच्या आगामी सण-उत्सवांबाबतची भूमिका, कल्याण आयुक्तालयाचा मुद्दा आणि गुन्ह्य़ांच्या वाढत्या प्रमाणाबाबतचा प्रश्न आदींबाबत ‘लोकसत्ता ठाणे’ने केलेली खास बातचीत.

सोनसाखळी चोरीचे वाढते प्रमाण कधी रोखणार?
सोनसाखळी चोरीच्या बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर भागात होणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस दल सज्ज असून या घटनांमध्ये गेल्या दीड महिन्यांत घट झाली आहे. २०१५ मध्ये आत्तापर्यंत ९९ घटना घडल्या असून त्यातील ६० घटनांची उकल झाली आहे व मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. मुख्यत्वे कल्याण, रायगड पट्टय़ातील इराणी वस्तीतील तरुण व काही परप्रांतीय तरुण दुचाकीवरून येऊन सोनसाखळी चोऱ्या करतात. तसेच काही तरुण हौसमौज करण्यासाठी या चोऱ्या करून पैसे मिळवतात. या घटना सायंकाळी व सकाळी घडत असून मंदिर, शाळा तसेच सकाळी चालण्यासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांच्या सोनसाखळ्या ओढण्याचे प्रकार होत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी या सार्वजनिक स्थळांवर पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. यावर मुख्य उपाय म्हणजे पोलिसांचे सोनसाखळी चोरीविरोधी पथक स्थापन करण्यात आले आहे. यात साहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक असे एकूण १५ कर्मचारी आहेत. या पथकातील प्रत्येकाने या चोरीच्या प्रकारांची नीट माहिती करून घेतली आहे. सीसीटीव्हीमार्फत सोनसाखळी चोरीचे मिळालेले चित्रीकरण आदींचाही या पथकाने अभ्यास केला आहे. नुकत्याच पकडण्यात आलेल्या एका टोळीकडून १८ गुन्हे उघडकीस आले आहेत.
घरफोडय़ांचे प्रमाणही वाढले आहे, त्यावर काय उपाय केलेत?
बदलापूर व अंबरनाथ भागात मुख्यत्वे चाकरमानी वर्ग मोठय़ा प्रमाणावर राहतो. त्यामुळे सकाळी नोकरीवर गेल्याने अनेक घरे बंद असतात. ही बंद घरे या घरफोडय़ा करणाऱ्या चोरांचे लक्ष्य होत आहेत. यावर पोलीस कारवाई करीत असून नुकतेच नेरळ येथून आरोपी पकडण्यात आला आहे. पोलिसांची पथके या चोरांचा मागही काढत आहेत. रायगड जिल्हा, कळवा झोपडपट्टी, मुलुंड या भागातील चोर हे या भागात येऊन चोऱ्या करीत आहेत. यावर उपाय म्हणून इमारतीतील रहिवाशांनी सतर्क राहावे. तसेच, सोसायटीधारकांनी इमारतीच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही लावणे गरजेचे आहे. तसेच, अनेक ठिकाणी सुरक्षारक्षक नाहीत. शिवाय ज्या ठिकाणी सुरक्षारक्षक आहेत, ते परंप्रांतीय किंवा नेपाळी आहेत. अनेक ठिकाणी हे सुरक्षारक्षक हजार ते दोन हजार पगारावर काम करतात. यामागे त्यांचा हेतू हा वेगळा असतो. अनेकदा ते सोसायटय़ांमध्ये पाणी सोडण्याची छोटी कामेही करतात. चोरीच्या घटना रोखण्यासाठी अशा सुरक्षारक्षकांची नाट माहिती करून घेणे आवश्यक असते. सोसायटय़ांनी अशा सुरक्षारक्षकांची संपूर्ण माहिती, छायाचित्र ठेवावे. संबंधित पोलीस ठाण्यातही तो तपशील द्यावा. याबाबत पोलीस अधिकारी सोसायटीच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
पोलिसांवरील ताण वाढत असून कर्मचाऱ्यांचे संख्याबळ कमी आहे का?
अंबरनाथ व बदलापूर भागात लोकसंख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे येथे गुन्ह्य़ांचे प्रकारही वाढत आहेत. या गुन्ह्य़ांमुळे कर्मचाऱ्यांवरील ताण वाढत असला तरी त्याचा परिणाम हा गुन्हे उकल करण्यावर झालेला नाही. गुन्हे निपटण्याचे प्रमाण परिमंडळ-४ भागात चांगले आहे. पण, लोकसंख्येच्या तुलनेत मात्र येथील पोलिसांची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आम्ही पोलीस कर्मचारी व अधिकारी यांची संख्या वाढवणार आहोत. जेणेकरून गुन्हे उकल ही अधिक जलदगतीने होऊ शकेल. बदलापूर पूर्व व पश्चिम येथे अधिकारी व कर्मचारी यांचे प्रमाण योग्य आहे.
गुन्हेगारांची बदलती मानसिकता व अत्याधुनिक साधनांनी होणाऱ्या चोऱ्या यावरील उपाय?
भुरटय़ा चोऱ्या, घरफोडय़ा याचबरोबरीने या भागात बँकांवरील दरोडा, सायबर गुन्हे, आर्थिक फसवणुकीचे गुन्हे आदींचेही प्रमाण वाढू लागले आहे. यावर उपाय म्हणून आम्ही सत्र न्यायालयात जाणाऱ्या गंभीर गुन्ह्य़ांचा तपास करण्यासाठी तपास शाखेची स्थापना केली आहे. यात, एक अधिकारी व तीन पोलीस कर्मचारी असून त्यांच्याकडे फक्त या गुन्ह्य़ाची उकल करण्याचेच काम देण्यात आले आहे. तसेच, याचबरोबरीने सायबर गुन्हे, आर्थिक फसवणुकीचे गुन्हे यांच्याबद्दल आम्ही कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करतो, जेणेकरून या गुन्ह्य़ांच्या व हे गुन्हे करणाऱ्यांच्या मानसिकतेची कर्मचाऱ्यांना माहिती होईल. यासाठी कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळाही आयोजित केली होती. याला १०० तरुण अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वाढत्या शहरीकरणामुळे कल्याण आयुक्तालय होणार का?
या मुद्दय़ाबाबत पोलीस आयुक्त,  सह-पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त आदींची बैठक झाली आहे. यात कल्याण परिमंडळातून डोंबिवली परिमंडळ वेगळे केल्याने प्रशासकीय कामकाज सुरळीत होईल. तसेच ठाणे पोलीस आयुक्तालयात ३३ पोलीस स्थानके असून यात अजून पोलीस स्थानके वाढविणार आहोत. बदलापूरजवळील कुळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचा ठाणे पोलीस आयुक्तालयात समावेश करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच, गुन्हे उकल होण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा आता अधिक वाढत चालले आहे.
आगामी सण-उत्सवांचे नियोजन काय?
आगामी सण-उत्सव हे सर्व समाजांतील लोकांना एकत्र आणत पार पाडायचे आहेत. सण व सोहळे आदर्श रीतीने साजरे व्हावेत म्हणून समाजातील लोकांशी आम्ही संबंध वृद्धिंगत करणार आहोत. तरुण वर्ग हा सण-उत्सवांच्या काळात अग्रभागी असतो. त्यामुळे आम्ही या वेळेस महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. तसेच, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनिप्रदूषणाच्या निर्देशांबाबत सार्वजनिक मंडळांच्या बैठका घेणार आहोत. मंडप हा रस्त्याच्या एकचतुर्थाश भागात असावा, जेणेकरून वाहतुकीस अडथळा होणार नाही, याबाबतही मंडळांशी बैठकीत चर्चा करणार आहोत. उत्सवांना गालबोट लागू नये यासाठी आमचे पोलीस कर्मचारी सज्ज झाले आहेत.