शनिवारी ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ वार्षिकांकाच्या निमित्ताने मार्गदर्शन, तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे  : जगावरील युद्धजन्य अनिश्चितता, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल, धातू आणि अन्य महत्त्वाच्या जिनसांचा किंमत भडका आणि देशांतर्गत महागाईचा चढत असलेला पारा अशा अस्थिर स्थितीत गुंतवणूक कशी आणि कुठे करावी, याचे मार्गदर्शन शनिवार, २६ मार्चला गुंतवणूकदार जागराच्या कार्यक्रमातून केले जाणार आहे. नवीन आर्थिक वर्षांत आर्थिक नियोजनाची घडी बसवून देणाऱ्या ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ या वार्षिकांकाच्या निमित्ताने हा कार्यक्रम होत आहे. या विशेषांकाच्या प्रकाशनाचे यंदाचे हे सलग नववे वर्ष आहे.

आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड प्रायोजित आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. सह-प्रायोजक असलेला ‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’ हा गुंतवणूकदार मार्गदर्शनपर उपक्रम शनिवारी, २६ मार्चला सायंकाळी ६ वाजता हॉटेल टिपटॉप प्लाझा, एलबीएस मार्ग, चेकनाक्याजवळ, रहेजा गार्डनसमोर, ठाणे (प.) येथे होत आहे. या निमित्ताने गुंतवणूकदारांना सहभागी तज्ज्ञांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या मनांतील प्रश्न विचारण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

तेलाच्या भडक्याने तापलेली महागाई आणि घटणारे व्याजाचे दर असे सर्वसामान्यांपुढे दुहेरी संकट उभे राहिले आहे. अशा स्थितीत पैशाने पैसा वाढवायचा तर गुंतवणूक करावीच लागेल आणि पैसा गुंतवायचा तर कमी-जास्त का असेना जोखीम घ्यावीच लागेल. महिन्याकाठी खर्च वजा जाता गाठीशी राहणारा पैसा वेगवेगळय़ा गुंतवणूक पर्यायांमध्ये विभागून जोखमीलाही टाळणाऱ्या गुंतवणुकीचे वेगवेगळय़ा वाटांचे दिशादर्शन म्हणून हा परिसंवाद गुंतवणूकदारांना मदतकारक ठरेल.

या परिसंवादात ‘समभाग गुंतवणुकीतून संपत्ती निर्मिती’ या विषयावर स्तंभलेखक आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीचे अभ्यासक अजय वािळबे, ‘गुंतवणुकीला निर्धोक बनविणारे मालमत्ता विभाजन’ यावर अर्थ-अभ्यासक व वित्तीय नियोजनकार कौस्तुभ जोशी, तर ‘गुंतवणुकीतून करावयाचे कर नियोजन’ या विषयावर सनदी लेखापाल व कर-सल्लागार प्रवीण देशपांडे मार्गदर्शन करतील.

यंदाच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकराच्या रचनेत कोणताही बदल नसला तरी, गुंतवणुकीच्या धोरणात कोणते बदल करावेत आणि पर्याय कोणते या बाबतचे हे मार्गदर्शन गुंतवणूकदारांसाठी निश्चितच उद्बोधक ठरेल.

   कधी?   

शनिवार, २६ मार्च २०२२,सायंकाळी ६ वाजता

   कुठे?

 हॉटेल टिपटॉप प्लाझा, एलबीएस मार्ग, चेकनाक्याजवळ, रहेजा गार्डनसमोर, ठाणे (प.)

   तज्ज्ञ मार्गदर्शक :

  •  भांडवली बाजारातील गुंतवणूक : अजय वाळिंबे
  •  गुंतवणुकीतून कर नियोजन : प्रवीण देशपांडे
  •  गुंतवणुकीला निर्धोक बनविणारे मालमत्ता विभाजन: कौस्तुभ जोशी

कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वासाठी खुला आणि विनामूल्य असेल.

(Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.)

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Invest times instability guidance occasion anniversary opportunity tinteract amy
First published on: 24-03-2022 at 05:32 IST