उल्हासनगरः उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण विभागात गेल्या १२ वर्षात गंभीर स्वरूपाच्या अनियमितता झाल्याने या विभागाची स्थानिक निधी लेखा परिक्षण विभागाच्या माध्यमातून विशेष लेखा परिक्षण करण्यासाठी गेल्य़ाच महिन्यात आयुक्तांनी विनंती केली होती. हे परिक्षण सुरू असताना शिक्षण विभागात चोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. लेखा परिक्षणाच्या काळातच चोरीचा प्रयत्न झाल्याने अनेक तर्क वितर्कांना उधान आले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या  लेखा परिक्षणाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. उल्हासनगर महापालिकेचा शिक्षण विभाग हा पालिका मुख्यालयापासून दूर कॅम्प दोन भागातील वुडलॅंड कॉम्प्लेक्स या इमारतीत तीसऱ्या माळ्यावर कार्यरत आहे.

हेही वाचा >>> वर्षभरात कल्याण रेल्वे स्थानका जवळील २५ हजार रिक्षा चालकांवर कारवाई,एक कोटी ७० लाखाचा दंड वसूल

पालिका मुख्यालयापासून दूर असल्याने अनेकदा पालिकेच्या या विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. विविध कारणांमुळे शिक्षण विभाग कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी ६ डिसेंबरच्या मध्यरात्री याच कार्यालयात चोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. याप्रकरणी शिक्षण विभागाचे हेमंत शेजवळ यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६ डिसेंबर रोजी सायंकाळी विभागाचे कार्यालय बंद करण्यात आले होते. त्यानंतर ७ डिसेंबर रोजी कार्यालय उघडण्यावेळी चोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले.

हेही वाचा >>> सुदृढ आरोग्याचा संदेश देत सायकल स्वारांची कल्याण-गुजरात मोहीम,तीन दिवसात ४२० किमी अंतर पार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धक्कादायक बाब म्हणजे गेल्याच महिन्यात शिक्षण विभागाविरूद्ध असलेल्या अनेक तक्रारी असल्याने उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी शिक्षण विभागाच्या गेल्या १२ वर्षांच्या कालावधीतील कारभाराचे विशेष लेखा परिक्षण करण्याची विनंती करण्याचे पत्र स्थानिक निधी लेखा परिक्षण विभागाच्या संचालकांना दिले होते. शिक्षण विभागाच्या कारभारात गेल्या १२ वर्षात विविध स्वरूपाच्या गंभीर अनियमितता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे या पत्रात आय़ुक्तांनी नमूद केले होते. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कारभाराचे लेखापरिक्षण सुरू होण्याच्या पूर्वीच शिक्षण विभागाच्या कार्यालयात चोरीचा प्रयत्न झाल्याने अनेक तर्कवितर्कांना उधान आले आहे. लेखा परीक्षण सुरू होण्यापूर्वी कागदपत्रांची लपवा छपवी करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना असा संशय आता व्यक्त होतो आहे. लेखा परीक्षण आणि चोरीच्या प्रयत्नाच्या घटनेला एकत्रितपणे पाहिले जाते आहे.