ठाणे : रोहीत आर्या याचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर आता राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर टीका केली. कंत्राटदार रोहीत आर्या आणि डाॅ. संपदा मुंडे यांचा मृत्यू संस्थात्मक मर्डर असल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी ट्विट करत केला.

आव्हाड यांनी त्यांच्या एक्स या समाजमाध्यमावर आरोप केला आहे. आव्हाड म्हणाले की, शासकीय कंत्राटदार रोहित आर्या आणि डॉक्टर संपदा मुंडे एकाने अवाजवी धाडस करून समाजातील सर्वात निरपराध आणि असहाय संवेदनशील अशा बालकांप्रती आगळीक केली आणि दुसरीने सोबत वावरणाऱ्या सर्वांच्या दबाव दडपणाविरुद्ध आवाज उठवण्याचा इवलासा प्रयत्न केला. त्यात काही एक आशेचा किरण दिसत नसल्याने आणि यंत्रणेच्या हितसंबंधात ब्र काढल्याने स्वतःलाच आरोपी च्या पिंजऱ्यात उभे केल्याने हतबल होऊन स्वतःच्या जीवाशी आगळीक केली. आठवडाभराच्या फरकाने घडलेल्या या दोन्ही प्रकरणात समाजमन ढवळून निघाले आहे.

कालच्या प्रकरणात मूर्ख ठरलेल्या रोहित आर्याने या मुर्दाड आणि असंवेदनशील व्यवस्थेशी झगडताना स्वतः च्या फाजील आत्मविश्वासावर भरोसा ठेवला आणि अघोरी प्रकार करून बेकायदेशीरपणे आपले कायदेशीर प्रश्न सोडविण्यासाठी स्वतःकाही तरी अचाट प्रयत्न केले आणि परिणामी स्वतःच्या छातीवर यंत्रणेकडून गोळी मारून घेतली. कारण हे एनकाउंटर त्याने स्वतः ओढवून घेतले आहे.

आता ज्यांनी गोळी झाडली किंवा तथाकथित एनकाउंटर केले त्यांनी किती धैर्य धाडस आणि बहादुरी दाखविली.. याची चर्चा तथाकथित पेड हँडलर्स आणि पीआर एजेन्सीज करतील. त्या अधिकाऱ्याना कोवळ्या निष्पाप १७ बालकाना सुखरूप बाहेर काढले आणि मुर्दाड शासनव्यवस्थेच्या लज्जेचे धिंडवडे निघण्यापासून रक्षण केले याबद्दल शौर्य पदक जाहीर होईल असे आव्हाड म्हणाले.

रोहीत आर्या सूज्ञ… – रोहित आर्याच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर जाऊन व्हिडिओ पाहिले की समजते हा माणूस सुज्ञ तर दिसत आहे. स्वच्छते सारख्या सामाजिक जबाबदारीचं बाळकडू विद्यार्थीदशेत शाळकरी मुलांना शिकविण्यासाठी त्यांना स्वच्छतादूत म्हणून जबाबदारी आणि ओळख देवून सामाजिक उपक्रम मुलांच्या सहभागातून राबविण्याचा अभिनव प्रयोग करणारा एक उपक्रमशील जबाबदार नागरिक होता. तसे तर राज्य शासनाच्या सन्माननीय मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत व्यासपीठावर हजेरी लावण्यासाठी संबंधित व्यक्ती मनोरुग्ण आणि फ्रॉड नसावा हा किमान निकष निश्चित असतो असेही आव्हाड म्हणाले.

राज्यातील गुप्तचर यंत्रणा तशी खात्री केल्याशिवाय अशा कार्यक्रमास परवानगी साठी ना हरकत देत नाहीत. त्यात तर हा रोहित आर्या तर सन्माननीय मुख्यमंत्री महोदया समवेत ईतर मंत्री महोदयाच्या मांडीला मांडी लावून बसला आहे. म्हणजे हा रोहित आर्या जसा दाखविला जातो तसे गेल्या २ वर्षापूर्वी तर ठार मनोरुग्ण नव्हता किंबहुना तसे शक्य नाही आणि जर असे असेल तर संबंधित गुप्तचर यंत्रणा कशासाठी काम करत आहेत. त्यांची काय जबाबदारी आहे असे आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले.

संस्थात्मक मर्डर… – जर या २ वर्षात ह्या सामाजिक जबाबदारीचे भान असणाऱ्या उपक्रमशील व्यक्तीचे मनोरुग्ण म्हणून जबरदस्तीचे रूपांतरण करण्यात कोण जबाबदार आहे. याचा शासनाने शोध घ्यावा. नेमके काय घडले आहे याबाबत कोणी त्यास असे पूर्णपणे बेकायदेशीर पाऊल टाकण्यास उद्युक्त केले, काय घडले असेल याबाबत समाज माध्यमावर आलेले व्हिडिओ पाहून ( कारण हे व्हिडिओ या घटनेपूर्वीचे आणि निष्पक्ष आहेत.) तशी खात्री सर्वांना पटली आहे. म्हणून या आठवड्यात घडलेल्या या दोन घटनांमुळे मन अस्वस्थ आणि विषण्ण झाले आहे. ह्या दोन्ही घटना ह्या एक प्रकारच्या संस्थात्मक मर्डर आहेत. शासकीय परिभाषेत किंवा दप्तरी भाषेत त्याना एनकाउंटर किंवा आत्महत्या म्हणतात. आणि आपल्या मनात शासकीय राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेच्या संस्थात्मक निष्काळजीपणाचे “ बळी “.

एखाद्या चौकशी अहवालात त्यावर पडदा पडणार आणि त्यास मनोरुग्ण, बाहेरख्याली म्हणून ठपका ठेवून त्याच victim ला जबाबदार ठरवून पुढच्या victim साठी तयारी करून ठेवणार.. नव्हे त्या यंत्रणेतील सहभागी असणाऱ्या सर्वाना कायदेशीर संरक्षणाची SOP नियमानुसार तयार करून देणार. पण आता सर्वच जण दहशतीखाली आहेत. तुम्ही या यंत्रणेमध्ये एक तर सामील व्हा आणि त्याचे थोडे फार फायदे घ्या. नाही तर यंत्रणेच्या प्रत्येक निर्णय आणि अन्मलबजावणी प्रक्रियेस मूक संमती देऊन शांत बसा. आवाज उठवला किंवा नाराजी व्यक्त केली स्वतःचे अस्तित्व दाखविण्याचा चाकोरीबाहेर विचार जरी केला तरी तुम्ही एक तर मनोरुग्ण ठरविले जाणार किंवा तुमच्या चारित्र्यावर संशय निर्माण करण्यासाठी तथाकथित घटनात्मक संस्थेचे प्रमुख म्हणून जबाबदारी भुषविणारे सुपारीबाज

प्रेस कॉन्फरन्स घेणार..मूळ प्रश्न हा नेहमीच बाजूला सारून तुम्ही स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहणार ते पण तुमच्या पश्चात..तुम्ही भितीवरील फोटोतून बघत राहणार मूकपणे… कसा मूळ मुद्दा आणि तुमची व्यथा पडद्याआड गेली आहे आणि नवीनच निष्कर्ष बाहेर येत आहेत. त्यावर प्रत्येक जण आपआपल्या परीने हितसंबंध जोपासत आहे याचे आश्चर्य वाटत आपल्या फोटोवर येणाऱ्या नवीन हाराच्या दडपणाचे ओझे घेऊन. शांत, निश्चल, हतबल आणि असहाय..! असे मत आव्हाड यांनी व्यक्त केले.