मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमांतर्गत विविध विकासकामांचे लोकार्पण आणि रस्ते कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. कळव्यातील कार्यक्रमाला अनुपस्थित असलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करत ‘मला या गोष्टीचा आनंद आहे की, या सुंदर कामाचे उदघाटन मुख्यमंत्री करीत आहेत’, असे  म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस काम करत आहेत; आनंद परांजपे यांचा गंभीर आरोप

मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमांतर्गत केंद्र सरकार, राज्य सरकार, ठाणे महापालिका, ठाणे स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात विविध विकास कामे करण्यात आली आहेत. त्यात कोपरी मीठबंदर येथील खाडी सुशोभीकरण, गावदेवी भूमीगत वाहनतळ, कळवा खाडी सुशोभीकरण, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील प्रसूती कक्ष, शस्त्रक्रिया विभाग आणि वाचनालय, ज्ञानसाधना महाविद्यालय येथील उद्यान, परिवहन सेवेच्या विजेवरील बसगाड्या या प्रकल्पांचे लोकपर्ण मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. याशिवाय नव्याने तयार करण्यात आलेले वाहतूक बेट आणि रस्ते मजबुतीकरण महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. कोपरी येथील खाडी सुशोभीकरण प्रकल्प लोकार्पण कार्यक्रमानंतर अनेकांनी शिंदे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती. 

ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असा सामना गेल्या काही दिवसंपासू  रंगला आहे. असे असतानाच कळव्यातील कार्यक्रमाला अनुपस्थित असलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सन २०१७ साली मिलिंद पाटील हे विरोधी पक्षनेते असताना कळवा खाडीकिनारी सुशोभिकरण प्रकल्पाच्या संचालक मंडळात असल्याकारणाने कळव्यासाठी हा प्रकल्प मंजूर झाला होता. हे काम बऱ्याच दिवसांपूर्वी पूर्ण झाले होते. सगळ्या नगरसेवकांनी बैठक घेऊन याचे उदघाटन देखील करण्याचे ठरवले होते. पण, मिलिंद पाटील आजारी असल्याने उदघाटन करता आले नाही. मला या गोष्टीचा आनंद आहे की, या सुंदर कामाचे उदघाटन मुख्यमंत्री करीत आहेत. फक्त जनतेच्या माहितीसाठी की कळव्यातील कामे कशी व्यवस्थित होत आहेत आणि त्याचाच आम्हांला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांद्वारे व्यक्त केली आहे.

हेही वाचा >>> मुंबई ते गोवा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ लवकरच, रेल्वे राज्यमंत्री दानवे यांचे आमदारांना आश्वासन

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उपोषण मागे कोपरी येथील सिद्धार्थ नगर भागातील झोपडपट्टी मधील रहिवाशांनी आपल्या हक्कांच्या घरांसाठी मागील काही दिवसापासून उपोषण सुरू केले होते. शनिवारी प्रकल्प लोकपर्ण कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांची बाजू ऐकून घेऊन त्यांच्या घरांचा प्रश्न लवकरच सोडायला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर रहिवाशांनी उपोषण मागे घेतले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad reaction on bhoomi pujan for road works by chief minister eknath shinde zws
First published on: 04-03-2023 at 17:32 IST