ठाणे : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या तांदुळवाडी गावचा रहिवाशी असलेला हर्षल पाटील हा कंत्राटदार होता. त्याने आत्महत्या केली असून त्याच्या आत्महत्येवरून आता सरकारवर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारच्या लोकप्रिय योजनांमागचे असंवेदनशील वास्तव… वाळवा तालुक्यातील एका मेहनती तरुणाची आत्महत्या असे म्हटले आहे.
हर्षल पाटील हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या तांदुळवाडी गावचा एक कष्टाळू, तरुण कंत्राटदार होता. त्याने सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम पूर्ण केले. त्याने कामाचे बिल दिले. पण, बिचाऱ्याला पैसे मिळालेच नाहीत, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. हर्षल पाटीलची सरकारकडे १ कोटी ४० लाख इतकी थकबाकी होती. पैसे मिळत नाहीत म्हणून त्याने ६५ लाखांचे कर्ज काढले. शेवटी आर्थिक तणावात येऊन फास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवले. पाठीमागे पत्नी, लहान मुलगी, वृद्ध आईवडील, आणि दोन लहान भाऊ… यांना ठेवून गेला, असे आव्हाड म्हणाले.
सरकारकडे बिल देण्यासाठी पैसेच नाहीत
“लाडकी बहीण योजना” ही एक लोकप्रिय योजना असली तरी ती आर्थिकदृष्ट्या राज्याला पेलवणारी योजना नाही. एकीकडे या योजनेसाठी सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी बाजूला काढला. राज्यावर कर्जाचा बोजा वाढवला. दुसरीकडे मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा खात्यांची हजारो कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांची बिल अडवली गेली आहेत. कारण राज्य सरकारकडे ही बिले देण्यासाठी पैसेच नाहीत, असा दावा आव्हाड यांनी केला आहे.
दुर्दैवाने त्याची सुरुवात झाली आहे
मी मागे म्हणालो होतो, “काही महिने जाऊ द्या..कितीतरी कंत्राटदार आत्महत्या करतील. दुर्दैवाने त्याची सुरुवात झाली आहे. आज हर्षल पाटील गेलाय, पण उद्या अजून किती जण या दुर्दैवी फेऱ्यात अडकतील, याची कल्पनाच न केलेली बरी. हे केवळ आर्थिक संकट नाही, तर प्रशासकीय अपयश देखील आहे. निवडणुका जिंकण्यासाठी लोकांना मोफत सुविधा द्यायच्या, पण त्या माग आवश्यक असणारा आर्थिक ताळेबंद साधायचा नाही.
हर्षल पाटील यांची आत्महत्या ही केवळ एक वैयक्तिक दु:खद घटना नाही. ती एक इशारा आहे. राज्य शासन, प्रशासन आणि समाजाने ही गोष्ट गांभीर्याने घेने गरजेचं आहे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.