ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून घोडबंदर भागात पाणी, रस्ते, वाहतूक कोंडीची समस्याविरोधात गृह संकुलातील रहिवासी एकवटले असून जस्टिस फॉर घोडबंदर रोड अशी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत रविवारी घोडबंदर भागातील ८० ते ९० गृहसंकुलाच्या पदाधिकार्यांची एकत्रित बैठक झाली.
या बैठकीत वाहतूक, ठाणे महापालिका पाणी पुरवठा, महावितरण ,एमएमआरडीए अशा विविध विभागांचे अधिकारी तसेच खासदार नरेश म्हस्के उपस्थित होते. यासर्वांसमोर सर्व घोडबंदरवासियांनी समस्येचा पाढा वाचला. यावेळी येत्या दोन ते तीन दिवसात ठाणे महापालिका मुख्यालयात आयुक्तांसोबत बैठक आयोजित करुन या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढू असे आश्वासन रहिवाशांना देण्यात आले.
ठाण्यातील घोडबंदर हा भाग ठाण्यातील सर्वाधिक वेगाने नागरिकरण होणारा भाग आहे. नागरिकरण वाढले असले तरी येथे मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे, सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यामध्ये जोडणी अशा प्रकल्पांमुळे ठिकठिकाणी खोदकामे झाली असून येथील रस्ते अरूंद झाले आहेत. वाहनांची वर्दळ वाढत असताना खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिक बेजार झाले आहेत.
वाहतूक कोंडीमुळे येथील रहिवाशांच्या कामाच्या वेळांमध्येही बदल करावा लागला आहे. अवजड वाहनांची वाहतुक, ट्रक टर्मिनस उपलब्ध नसणे यामुळे धोकादायकरित्या येथील रहिवाशांना वाहतुक करावी लागते. उंच मजल्याच्या इमारती वाढत असताना पायाभूत सुविधांची वाणवा आहे. त्यामुळे येथील अनेक गृह संकुलांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे.
अनेक समस्या प्रलंबित असल्याने येथील रहिवाशांनी ‘जस्टिस फॉर घोडबंदर रोड’च्या माध्यमातून एकत्र येऊन समस्यांचा पाढा रविवारी सर्व अधिकारी आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या समोर वाचला. कासारवडवली येथील राम मंदीर सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीला घोडबंदरमधील ८० ते ९० गृह संकुलाचे पदाधिकारी उपस्थित होते.

येत्या दोन ते तीन दिवसात ठाणे महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासोबत बैठक केली जाणार असून यावेळी सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित असणार आहेत, असे जस्टिस फॉर घोडबंदर रोडचे सदस्य गिरीश पाटील यांनी सांगीतले.
