ठाणे : ठाणे शहरासह परिसरातील रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या नुतनीकरणाच्या कामात मोठा भोंगळपणा समोर आला आहे. १८ वॉर्डपैकी एका वॉर्डाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी प्राणवायू (ऑक्सिजन) वाहिनी बसविण्याची व्यवस्था उभारायची राहून गेल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. पालिकेने नंतर त्या वॉर्डात तातडीने वाहिनी बसवली असली, तरी उर्वरित वॉर्डाची दुरुस्तीचेे काम करताना त्याठिकाणी प्राणवायू (ऑक्सिजन) वाहिनी बसविण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला असला तरी, त्याची निविदाच अद्याप काढलेली नाही. या नियोजन शुन्य कारभारामुळे दुरुस्तीचे काम लांबणीवर पडल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिकेचे कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. सुमारे पाचशे खाटांचे हे रुग्णालय असून येथे ठाणे शहर तसेच आसपासच्या शहरासह ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालयातील उपचार खाटांच्या तुलनेत येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाचे नूतनीकरण करण्याबरोबरच खाटांच्या क्षमतेत वाढ करण्याचे आदेश दिले होते. तसेच या कामासाठी राज्य शासनाकडून १३५ कोटींचा निधी दिला होता. यापैकी पहिल्या टप्प्यात ६० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यातून रुग्णालयाचे काम सुरू करण्यात आले आहे.

नुतनीकरणाद्वारे रुग्णालयातील खाटांची संख्या ५०० वरून ८४० एवढी करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच ते सहा महिन्यांपुर्वी निविदा काढून काम सुरु केले. आरोग्य सेवा बंद ठेवून काम करणे शक्य नसल्यामुळे टप्प्याटप्प्याने वाॅर्डाच्या नुतनीकरणाचे काम करण्यात येत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत एका वॉर्डचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र काम संपल्यावरच त्या ठिकाणी प्राणवायुची वाहिनी टाकायची राहून गेल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली. याठिकाणी प्राणवायु वाहीनीची व्यवस्था उभारणीची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची होती. मात्र, आपल्याकडून चुक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी नुतनीकरण केलेल्या वॉर्डमध्ये एका ठेकेदारामार्फत प्राणवायु वाहीनी बसविली.

दिवाळी आधी हे काम करण्यात आले. तसेच इतर वाॅर्डांची दुरुस्ती करताना तिथे अशी चुक होऊ नये म्हणून प्राणवायु वाहीनी बसविण्याचा प्रस्ताव रुग्णालय प्रशासनाने तयार केला. त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला. मात्र, या कामाची अद्याप निविदाच निघू शकलेली नाही. त्यामुळे वाॅर्डांच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. यात १७ वॉर्ड, ८ ऑपरेशन थिएटर, आयसीयू आणि लहान मुलांचा आयसीयूचा समावेश आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. एकूणच, रुग्णालय दुरुस्तीच्या कामात दाखविलेल्या बेफिकीरीमुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे चित्र या प्रकारातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा कारभार यापुर्वी पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत होता. मात्र, रुग्णालयातील सुविधांविषयीच्या तक्रारीनंतर मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णालयाच पदभार काढून तो रुग्णालय प्रशासनाकडे देण्यात आला. कळवा रुग्णालयातील सेवा सुविधांमध्ये त्रुटी राहू नयेत आणि तेथील कामकाज हाताळणाऱ्या प्रशासनाला निर्णय घेणे सोपे जावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयानंतरही रुग्णालयाचा नियोजन शुन्य कारभार सातत्याने पुढे येत आहे.

रुग्णालयातील वाॅर्डांची टप्प्याटप्प्याने दुरुस्ती करण्यात येत असून दुरुस्तीनंतरच प्राणवायु वाहीनी बसविण्यात येते. दुरुस्ती करण्यात आलेल्या वाॅर्डात प्राणवायु वाहीनी बसविण्यात आलेली आहे. तसेच इतर वार्डात वाहीनी बसविण्याच्या कामाची निविदा काढण्याची प्रक्रीया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे दुरुस्ती कामादरम्यान प्राणवायु वाहीनी टाकण्याबाबत विसरून गेले, असा काहीच प्रकार नाही, असा दावा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. अनिरुद्ध माळगावकर यांनी केला.