कल्याण : ब्रिटिश सरकारच्या काळात सरकारी खात्यात प्रामाणिकपणे नोकरी केली म्हणून ब्रिटिश सरकारने रावबहादूर या पदवीने सन्मानित केलेले काशिनाथ नारायण साने हे मूळचे कल्याणचे. २५ सप्टेंबर १८५१ हा त्यांचा जन्मदिवस. या जन्मदिवसाप्रमाणे का. ना. साने यांची १७५ वी जयंती आहे. कल्याणमध्ये पारनाका भागात रावबहादूर साने यांचा प्रशस्त वाडा होता. सरकारी नोकरी करताना त्यांनी इतिहासकालीन कागदपत्रांचा अभ्यास करून काही ग्रंथ, पुस्तके लिहिली. १७ मार्च १९२७ मध्ये रावबहादूर साने यांचे निधन झाले, अशी माहिती कल्याणच्या इतिहासाचे अभ्यासक डाॅ. श्रीनिवास साठे यांनी दिली.

राबबहादूर साने यांच्या १७५ व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या जीवनपटाची ही माहिती. काशिनाथ साने हे बाबासाहेब या टोपण नावाने ओळखले जात होते. इतिहास, मराठी साहित्याचे ते अभ्याक होते. शिक्षणाच्या निमित्ताने रावबहादूर साने पुणे येथे स्थलांतरित झाले. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. ची पदवी संपादन केली. महसूल विभागात नोकरी न मिळाल्याने त्यांनी शिक्षण विभागात शिक्षक, मुख्याध्यापक ते उप शिक्षणाधिकारी पदापर्यंत काम केले. करड्या शिस्तीचा शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. सेवा ज्येष्ठतेमध्ये पात्र असुनही त्यांना शिक्षणाधिकारी पदोन्नत्तीपासून डावलण्यात आले. त्यामुळे दुखावलेल्या स्वाभिमानी रावबहादूर साने यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन सरकारी नोकरीला रामराम ठोकला.
३८ वर्ष सरकारी खात्यात प्रामाणिकपणे नोकरी केल्यामुळे पंचम जाॅर्ज राजाच्या वाढदिवसानिमित्त ब्रिटिश सरकारने काशीनाथ नारायण साने यांना रावबहादूर साने किताब देऊन सन्मानित केले.

शिक्षण विभागात नोकरी करत असताना साने इतिहासकालीन ग्रंथ, बखरी यांचा अभ्यास करत होते. गावोगावी फिरून त्यांनी इतिहासकालीन पोथ्या, ग्रंथ जमा केले. १८७८ मध्ये का. ना. साने यांनी ‘काव्येतिहास संग्रह’ नावाचे मासिक सुरू केले. यासाठी त्यांना शतपत्रकार विष्णुशास्त्री चिपळूणकर, जनार्दन मोडक यांचे सहकार्य मिळाले. या मासिकात मराठी साहित्य, बखरी, संस्कृत काव्य, इतिहासकालीन माहिती प्रसिध्द केली जात होती. १९१३ ते १९२६ पर्यंत का. ना. साने पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष होते.

शिवाजी महाराजांची बखर, होळकरांची कैफियत, पानिपत बखर, शकावली, विविध राजकीय घराण्यांच्या बखरी, इतिहास ग्रंथरूपाने प्रसिध्द केला. रावबहादूर साने यांनी इतिहासकालीन लेखनाची साहित्य संपदा आताही संदर्भासाठी इतिहास संशोधक, इतिहासाचे अभ्यासक वापरतात, असे इतिहासाचे अभ्यासक डाॅ. श्रीनिवास साठे यांनी सांगितले.