बदलापूरः अंबरनाथ, मुरबाडसह रायगड जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर उल्हास नदीवर असलेल्या रायते पुलाखाली पाण्याची पातळी झापाट्याने वाढते आहे. त्यामुळे प्रवाह तीव्र झाल्याने या पुलावरून वाहनांची ये-जा धोकादायक ठरू शकते, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून रायते पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येते आहे. त्याचा फटका लांब पल्ल्याच्या वाहनांना बसणार आहे. दूरच्या प्रवासासाठी निघालेल्या बस सेवेला याचा मोठा फटका बसणार आहे.
महामार्ग प्राधिकरण, स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नदीची पातळी कमी झाल्यानंतर व प्रवाह सुरळीत झाल्यावरच पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या मात्र या परिसरातील नागरिक व वाहनचालकांनी सतर्क राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यातच सततच्या पावसामुळे कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील म्हारळजवळ पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी झाली आहे.
दुसरीकडे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीतही वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. सकाळी दहा वाजता उल्हास नदी १३.१७ मीटर उंचीवरून वाहत होती. सोमवारी रात्री ही पाणी पातळी १२ मीटर पर्यंत खाली होती. मात्र सकाळी रायगड जिल्ह्यातील कर्जत, माथेरान आणि आसपासच्या परिसरात झालेल्या पावसामुळे झपाट्याने पाणी पातळी वाढली. मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उल्हास नदीची पाणी पातळी १३.४१ मीटर पर्यंत वाढली होती. उल्हास नदीची इशारा पातळी १६.५ मीटर इतकी आहे. तर धोका पातळी १७.५ मीटर इतकी आहे.
सध्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळी सातत्याने वाढ होते आहे. दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरूच आहे. त्यात पावसाचा जोर अनेकदा वाढतो. त्यावेळी झपाट्याने पाणी वाढते.
बारवी धरणातून विसर्ग सुरूच
तीन दिवसांपूर्वी पूर्ण क्षमतेने भरलेल्या बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बारवी धरणातून ११०.५७ घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरण कार्यालयाच्या अभियंत्यांनी दिली आहे. कर्जत, माथेरान, नेरळ या भागात सुरू असलेला पाऊस आणि बारवी धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे कल्याण ग्रामीणमधील वरप, म्हारळ, कांबा या भागात पाणी पातळी वाढण्याची भीती व्यक्त होते आहे.