कल्याण : कल्याण बस आगाराच्या कल्याण आळेफाटा धावत्या बसच्या स्टेअरिंगचा राॅड रविवारी सकाळी मुरबाड सरळगाव रस्त्यावरील एका गाव हद्दीत अचानक तुटला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटताच बस रस्त्याच्या बाजुला असलेल्या झुडपांमधून एका झाडाला जाऊन आदळली. बस सपाटीला असताना हा अपघात झाल्याने मोठी हानी टळली.

या अपघातात सहा प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येते. चालकाने प्रसंगावधान राखल्याने त्यालाही किरकोळ दुखापत झाली. वाहकालाही मुका मार लागला आहे. दोन महिन्यापूर्वीच कल्याण बस आगाराच्या एका धावत्या बसचे पुढील चाक कल्याण मुरबाड रस्त्यावर गोवेली भागात अचानक निखळून बस रस्त्याला घासत जाऊन पुढे थांबली होती. यामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच सोमवारी माळशेज घाटमार्गे जाणाऱ्या कल्याण आळेफाटा बसच्या स्टेअरिंंगचा राॅड तुटल्याने अपघात झाला. ही घटना माळशेज घाट मार्गात झाली असती तर किती मोठी दुर्घटना घडली असती अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

अशाप्रकारच्या या सततच्या अपघातामुळे कल्याण बस आगारातील वाहन दुरुस्ती कार्यशाळेत बसची योग्यरितीने देखभाल दुरुस्ती केली जाते की नाही याचीही चौकशी होण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांकडून देण्यात येत आहेत. असे अपघात वारंवार होत असतील तर परिवहन विभागाने कल्याण बस आगाराच्या वाहन दुरुस्ती कार्यशाळेत कामगारांच्या मागण्या, तेथील तांत्रिक त्रृटी याची माहिती घ्यावी आणि ही कार्यशाळा पूर्ण क्षमतेने चालेल याची दक्षता घेण्याची मागणी प्रवासी करत आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक दिवस कल्याण बस आगाराला भेट देण्याची मागणी या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

कल्याण बस आगाराची बस २५ प्रवाशांना घेऊन मुरबाड रस्त्याने माळशेज घाट मार्गे आळेफाटा येथे सोमवारी सकाळी चालली होती. मुरबाड सरळगाव रस्त्यावर बस धावत असताना अचानक बसच्या स्टेअरिंगचा रॉड तुटला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस पुढे जाऊन रस्त्याच्या खाली उतरली. आणि रस्त्याशेजारी झुडपांमध्ये असलेल्या झाडाला या बसने धडक दिली. यात बसच्या डाव्या भागाचे नुकसान झाले. बस झाडाला धडकल्याने प्रवाशांना किरकोळ मार लागला. वाहकालाही मुका मार लागला आहे. ही बस झाडाला धडकल्याने पुन्हा एकदा मोठा अपघात टळला. या अपघाताबाबत कल्याण बस आगाराचे व्यवस्थापक महेश भोये यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तो होऊ शकला नाही.