परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचा कल्याणमध्ये इशारा

राज्य परिवहन महामंडळाचा चालक, वाहतूक पोलीस किंवा प्रशासकीय यंत्रणेच्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर मुजोर रिक्षाचालकाने हात टाकला तर त्यांची यापुढे गय केली जाणार नसल्याचा सूचक इशारा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी कल्याणमधील दौऱ्यात देताना भिवंडी व कल्याण येथे ज्या मुजोर रिक्षाचालकांनी एसटी चालक व वाहतूक पोलिसाला मारहाण केली होती, त्या दोन्ही रिक्षाचालकांच्या रिक्षा रावते यांच्या समक्ष ‘जेसीबी’ने तोडल्या.

गेल्या आठवडय़ात भिवंडी, कल्याण परिसरात रिक्षाचालकांनी एसटी चालक, वाहतूक पोलिसाला मारहाण केली होती. रिक्षाचालकांच्या या उद्दामपणाला आवर घालण्यासाठी, स्थानिक परिवहन अधिकाऱ्यांना बळ देण्यासाठी रावते यांनी कल्याण दौऱ्याचे आयोजन केले होते. मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात रिक्षाचालकांची मुजोरी खूप वाढली आहे. ही मुजोरी मोडून काढण्यासाठी उच्च न्यायालयाने शासनाला आदेश दिले आहेत. त्या आदेशाचे अधिकाऱ्यांकडून यापुढे काटेकोर पालन होईल, असे रावते यांनी स्पष्ट केले. प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांच्या व्यवसायाचा आम्ही आदर करतो. मात्र त्यांनी ऊठसूट उद्दामपणा करणे अपेक्षित नाही. नाठाळ रिक्षाचालकांना त्यांच्या रिक्षा संघटनांनी धडा शिकविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा रावते यांनी व्यक्त केली. एसटी चालक, पोलीस काय कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेच्या कर्मचाऱ्यावर रिक्षाचालकाने हात उचलला तर त्याची गय केली जाणार नाही , असा इशारा रावते यांनी दिला.

जप्त केलेल्या रिक्षांवर कारवाई

भिवंडी, कल्याण येथे ज्या मुजोर रिक्षाचालकांनी एसटी चालकाला, वाहतूक पोलिसाला मारहाण केली. त्या दोन्ही उद्दाम रिक्षाचालकांच्या जप्त केलेल्या दोन रिक्षा मंत्री दिवाकर रावते यांच्या समोर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने जेसीबीच्या साहाय्याने तोडून (चक्काचूर) टाकण्यात आल्या. यापुढे व्यवसायाची चौकट न पाळता रिक्षा व्यवसाय केला तर त्याचे परिणाम असेच होतील, असा इशारा या कारवाईच्या माध्यमातून रिक्षाचालकांना दिला. या वेळी रिक्षाचालकाच्या मारहाणीत जखमी झालेल्या भोसले या एसटी चालकाची रावते यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. कल्याणमध्ये गेल्या आठवडय़ात उपप्रादेशिक परिवहनच्या पथकाने केलेल्या कारवाईत बेशिस्त, मुजोर रिक्षाचालकांच्या २५८ रिक्षा जप्त केल्या आहेत. यामधील ३५ रिक्षा कालबाह्य़ झाल्या असून त्या रिक्षांचादेखील चक्काचूर करण्यात आला.

तरीही रिक्षाचालकांची मनमानी सुरूच!

डोंबिवली  : डोंबिवली पश्चिमेत गेल्या आठवडय़ापासून रिक्षा चालकांच्या एका संघटनेने आपल्या सदस्यांना एक रुपये वाढीव भाडे आकारण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे काही रिक्षा चालकांनी प्रवाशांकडून ही वाढीव भाडय़ाची आकारणी सुरू केली आहे. ही वसुली छुप्या पद्धतीने होत आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी गेल्या आठवडय़ात महात्मा फुले रस्त्यावरील रिक्षा वाहनतळावर कब्जा असलेल्या काही रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला, तेव्हा अशी कोणत्याही प्रकारची भाडेवाढ आम्ही केलेली नाही, अशी आक्रमक भूमिका या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती.

डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात आठ ते नऊ रिक्षा वाहनतळ आहेत. यापैकी एकाही वाहनतळावरील रिक्षा चालकांनी वाढीव भाडय़ाची आकारणी केलेली नाही. मग, पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील रिक्षा चालकांनीच गेल्या दोन दिवसांपासून कोणत्या अधिकाराने वाढीव भाडे वसुली प्रवाशांकडून सुरू केली आहे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

रिक्षा चालकाचा उद्दामपणा

रविवारी श्रद्धा गजानन जोशी ही महिला डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक ते महात्मा फुले रस्त्याने एमएच-०५-७७०५ या रिक्षेने प्रवास करीत होती. या महिलेकडून ‘ह’ प्रभाग कार्यालयाजवळील चौकात उतरल्यानंतर संबंधित रिक्षा चालकाने आठ रुपये प्रस्तावित भाडय़ाऐवजी वाढीव एक रुपया आकारून नऊ रुपये वसूल केले. या प्रवासी महिलेने वाढीव भाडे कधी झाले, असा प्रश्न चालकाला केला; तेव्हा ‘रेल्वे स्थानकाजवळ वाढीव भाडय़ाचे दर लावले आहेत आणि आमच्या संघटनेने तसा निर्णय घेतला आहे’, असे उद्दाम उत्तर महिला प्रवाशाला दिले.